रशियाला टाकले मागे : रुग्णसंख्या 7 लाखांवर : दिवसभरात 24 हजार 248 बाधितांची भर
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत आता तिसऱया स्थानी पोहोचला आहे. ‘वर्ल्डोमीटर’ संकेतस्थळाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारताने रशियाला मागे टाकले आहे. दरम्यान, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतीयांची चिंता वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी अद्याप त्याला यश आलेले नाही.
‘वर्ल्डोमीटर’च्या आकडेवारीनुसार भारतातील कोरोनाबाधितांनी 7 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर रशियामध्ये 6 लाख 87 हजार 862 एवढी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. सध्या भारताच्या पुढे अमेरिका आणि ब्राझील हे दोन आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 29 लाख 83 हजार इतकी असून ब्राझीलमध्ये हा आकडा 16 लाख 4 हजारपर्यंत पोहोचलेला आहे.
देशात दररोज 20 हजारांपेक्षा जास्त जणांना संसर्ग होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. ‘आरोग्य सेतू’ ऍपवरील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात कोरोनाचे 24 हजार 248 रुग्ण आढळले असून, देशभरातील रुग्णसंख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात आणखी 425 बळी गेले असून एकूण मृतांचा आकडा 19 हजार 693 झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढ अधिक आहे.
देशात आतापर्यंत 4,24,433 जणांची कोरोनावर मात
देशात दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाणही इतर देशांच्या तुलनेत समाधानकारक आहे. भारतात कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात सात लाख जणांना संसर्ग झाला असला तरी त्यापैकी 4 लाख 24 हजार 433 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशभरात 2 लाख 53 हजार 287 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यांची स्थिती
महाराष्ट्रात एका दिवसात 6,555 नवे रुग्ण सापडले असून एकूण प्रकरणांची संख्या 2,06,619 वर पोहोचली आहे. तामिळनाडू हे देशातील दुसऱया क्रमांकाचे प्रभावित राज्य आहे. तेथे आतापर्यंत 1,510 लोक मरण पावले असून 1,11,151 लोकांना संसर्ग झाला आहे. दिल्लीमध्ये 2,244 नवीन प्रकरणांसह एकूण रुग्णसंख्या एक लाखांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. दिल्लीत 25,038 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गुजरातमध्ये 36,037 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यानंतर उत्तर प्रदेश (27,707), तेलंगणा (23,902), कर्नाटक (23,474), पश्चिम बंगाल (22,126), राजस्थान (20,164) आंध्रप्रदेश (18,697), हरियाणा (17,005), मध्यप्रदेश (14,930), बिहार (11,876) आणि आसाम (11,388) या राज्यांचा क्रमांक लागतो. अन्य राज्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 10 हजारच्या खाली नोंदवण्यात आली आहे.
1 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या पूर्ण
भारताने कोरोना विषाणूच्या 1 कोटी चाचण्या (स्वॅब तपासणी) पूर्ण केली आहेत. या चाचण्यांमधून 6,97,413 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत चीनने सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या असून त्यापाठोपाठ अमेरिका, रशिया, ब्रिटन या देशांचा नंबर लागतो. भारत चाचण्यांमध्ये पाचव्या स्थानी आहे.
एकूण चाचण्या आणि पॉझिटिव्ह रुग्ण
देश एकूण चाचण्या पॉझिटिव्ह रुग्ण
चीन 9 कोटी 4 लाख 83,557
अमेरिका 3 कोटी 76 लाख 29,83,155
रशिया 2 कोटी 13 लाख 6,87,862
ब्रिटन 1 कोटी 5 लाख 2,85,416
भारत 1 कोटी 4 हजार 7,00,724
(संदर्भ : ‘वर्ल्डोमीटर’ इन्फो)