चिखलीतील कोविड हॉस्पिटलला दिली भेट
प्रतिनिधी / वास्को
शंभर टक्के लसीकरण हाच कोरोना संसर्गावर एकमात्र उपाय असून लसीकरणासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. दाबोळी मतदारसंघात शंभर टक्के लसीकरणासाठी आपले स्वंयसेवक लोकांना घराबाहेर काढतील व त्यांना सहकार्य करतील. आम्ही सध्या निर्माण झालेली परिस्थिती निश्चितच बदलू असे पंचायतमंत्री व दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे.
मंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी सकाळी चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलला भेट दिली. हे हॉस्पिटल नुकतेच कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आलेले असून या हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर मंत्री गुदिन्हो यांनी प्रथमच या हॉस्पिटलला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व कोरोना रूग्णांवरील उपचार तसेच साधन सुविधांचा आढावा घेतला. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासोबत जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, समाजसेवक कायतान झेवियर तसेच चिखलीचे सरपंच सेबी परेरा, बोगमाळोचे सरपंच लॉरेन्हा डिकुन्हा तसेच चिखली व बोगामाळोचे पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी चिखलीच्या हॉस्पिटलचे डॉ. अनिल हुम्रसकर, डॉ. अनिल मेहंद्रता, डॉ. विवेक पिल्ले तसेच हॉस्पिटलच्या परीचारीका यांच्याशी चर्चा केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला.
चिखलीतील हॉस्पिटलमध्ये चांगली सेवा
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटल कोरोना उपचार व व्यवस्थापनात चांगले कार्य करीत असून येथील डॉक्टर्स, परीचारीका तसेच इतर कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. तरीही कुठे काही कमी पडत असल्यास ती पोकळी भरून काढायला हवी. त्यासाठीच आपण हॉस्पिटलला भे दिलेली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण या हॉस्पिटलला ऑक्सिजन उपलब्ध केलेले आहे. मात्र, या हॉस्पिटलमध्ये ऑक्जिन पुरवठय़ाची अडचण आपल्याला दिसून आली. जीएसआयडीसीने अद्याप या हॉस्पिटलमधील रूग्णांपर्यंत ऑक्सिजन पाहोचवण्यासाठी वाहिनी घातलेली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करून ही सोय त्वरीत करण्यात यावी अशी मागणी आपण केलेली असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले. या हॉस्पिटलमध्ये अतिरीक्त डॉक्टर आणि नर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या हॉस्पिटलमध्ये चांगल्यात चांगली सेवा रूग्णांना पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
कोरोनावर शंभर टक्के लसीकरण हाच पर्याय
सद्यस्थितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. लसीकरण मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वांनी काम करायला हवे. ही वेळ कुणावरही टिका करण्याची नव्हे तर एकत्री काम करण्याची आहे. काही सुचना असल्यास आवश्य करायला हव्यात. दाबोळी मतदारसंघात लसीकरण शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी स्वंयसेवक लोकांना बाहेर काढतील. सध्या कोरोनाने जी परिस्थिती निर्माण पेलेली आहे. ती आम्ही आवश्यक बदलू असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
चिखलीच्या हॉस्पिटलचे खासगीकरण होऊ देणार नाही
चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खासगीकरण आपण होऊ देणार नाही असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
लोकांना चांगले हॉस्पिटल व सेवा मिळावी म्हणून या ठिकाणी कोटय़वधींचा खर्च करून साधनसुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्याचे खासगीकरण होऊ देणार नाही. खासगीकरणाची ही कल्पना कुणाची हे आपल्याला माहीत नाही. या हॉस्पिटलमध्ये आम्ही अधिकाअधीक सुधारणा करू. परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खासगीकरण होऊ देणार असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.