प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात असणाऱ्या कोरोना वार्डमध्ये आणि एका खासगी रुग्णालयात दोन कोरोना संशयितांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज मिळाला असून तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दोघांचाही मृत्यू कोरोनाने झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरातील कमदवाडी येथील एका 81 वर्षीय आजींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हृदयविकाराची लक्षणे दिसत होती. त्यातच त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. तरही खबरदारी म्हणून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तर दुसऱ्या प्रकरणात हातकणंगले तालुक्यातील एक तरुण दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र गंभीर अवस्थेत असताना त्याला सीपीआर रुग्णालयातील कोरोना कक्षात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचाही स्वॅब पुण्याला तपासणीसाठी पाठवला होता. मात्र, त्याचाही सीपाआरमधील कोरोना विलगीकरण कक्षात मृत्यू झाला.
दरम्यान, कोल्हापूरात मंगळवारी मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांचे स्वॅब अहवाल बुधवारी सीपीआर प्रशासनास मिळाले. त्या दोघांचीही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना कोरोना नसून दुसऱ्या आजारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. उल्हास मिसाळ यांनी सांगितले.