पोलीस प्रशासनाकडून दखल, व्हिडीओ करणाऱ्या तरुणाचा शोध घेवून तक्रारीबाबत तपशील घेणार
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरात प्रवेश करताच वाहतूक पोलीस टॅक्सी चालकांना विनाकारण दंड करीत असल्याच्या तक्रारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अँक्शन मुडवर आले आहेत. या व्हिडिओमुळे तक्रारी सुरू झाल्याने कोल्हापूर रस्त्यावर नाकाबंदीसाठी कार्यरत असलेल्या दोन वाहतूक पोलीसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर कर्मचाऱ्यांवर पुढील करवाई करण्यासाठी संबंधित व्हिडीओ करणाऱ्या कोल्हापुरातील तरुणाचा शोध घेऊन तक्रारीचा तपशील घेतला जाणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.
मिरज शहर वाहतूक पोलीस टॅक्सी चालकांची लुबाडणूक करीत असल्याबाबत कोल्हापूर येथील अजित पाटील या टॅक्सी चालकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून कारवाईची मागणी केली होती. हा व्होडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. वाहतूक पोलिसांच्या या लूटमारी विरोधात स्थानिक सामाजिक संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. व्हिडीओ मधील संबंधित टॅक्सी चालकाच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. व्हायरल होणारा संबंधित व्हिडीओ आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारीवरून कोल्हापूर रस्त्यावर कार्यरत असणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोषी असणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यासाठी कोल्हापुरातील ‘त्या’ टॅक्सी चालकाचा शोध घेऊन तक्रारीबाबत तपशील घेणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले आहे.