पालकमंत्री सतेज पाटील : आणखी एक ऑक्सिजन टँक बसवण्याचे नियोजन : खासगी दवाखान्यातही होणार ऍन्टीजन टेस्ट
संजीव खाडे / प्रतिनिधी
सीपीआरनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे रूग्णालय म्हणून आयजीएमचा नावलौकिक आहे. या ठिकाणी दाखल होणार्या कोरोना रूग्णांना ऑक्सिजन, मोफत रेडिमीसिव्हीयर लस यासह अन्य वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे आयजीएमची बदनामी न करता सामान्य नागरिकांमध्ये विश्वासाहर्ता वाढवण्यासाठी गट, तट पक्षभेद बाजूला करून एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजूबाबा आवळे, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजीव आवळे, जिल्हाशल्यचिकित्सक केम्पीपाटील उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, आयजीएम हॉस्पिटलसाठी सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यरत केला आहे. अजून त्याच क्षमतेचा आणखी एक टँक तेथे बसवला जाणार आहे. त्याचप्रमाणे सीटीस्कॅनची सोयही रूग्णालयात करण्यात येणार आहे. सध्या रूग्णालयात 200 बेड उपलब्ध आहेत, ते 300 पर्यंत नेण्याचेही नियोजन असून लवकरच याबाबत कार्यवाही होणार आहे.
रेमिडीसीव्हीयर लस आयजीएममध्ये मोफत
कोरोना रुग्णांसाठी असलेली रेमिडीसीव्हीयर लसीसाठी पैसे मागितले जात असल्याची तक्रार झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी ही लस आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्णांना मोफत दिली जात आहे. तसेच खासगी रूग्णालयात शासनाने दिलेल्या किमतीपेक्षा जादा दराने ही लस दिली जात असेल तर तात्काळ प्रांताकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
खासगी रूग्णालयांना ऍन्टीजन टेस्टची मुभा
शहरातील 10 बेडच्यावर असणार्या खासगी रूग्णालयामध्येही यापुढे ऍन्टीजन टेस्ट करण्याची कायदेशीर परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे रूग्णाला टेस्टसाठी कोविड सेंटरमध्ये पाठवण्याचा त्रास वाचणार असून केवळ 10 मिनिटात अहवाल मिळणार आहे. यासाठी शासनाच्या नियमानुसारच शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच 10 बेडच्या खालील रूग्णालयांनी नॉन कोविड रूग्णांना सेवा देण्याच्या सुचनाही देण्यात येणार आहेत.
पालकमंत्र्यांनी आयजीएमच्या ‘त्या’ 42 कर्मचार्यांना कंत्राटी पध्दतीने कामावर उपस्थित राहून सेवा देण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे व कोरोनाबाधितांचे प्रमाण या महिन्यात कमी झाल्याचे सांगितले. उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्हेंटीलेटरची कमतरता, जीवनमुक्ती कर्मचार्यांचाप्रश्न, कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकडेवारीतील तफावत, एचआरटीसीसाठी आकारले जाणारे जादा शुल्क, नॉन कोविड रूग्णांचे उपचाराअभावी होणारे हाल आदींची माहिती पालकमंत्र्यांना दिली. यावेळी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करून सर्व सोयी सुविधा देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगे, अधिक्षक गणेश बिरादार, नगरसेवक मदन कारंडे, राहूल खंजिरे, सुनिल पाटील, संजय केंगार, सागर चाळके, आरोग्याधिकारी सुनिलदत्त संगेवार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
आयजीएममध्ये पालकमंत्र्यांसमोरच वादावादी
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठकीअगोदर आयजीएम हॉस्पिटल येथे भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अतिदक्षता विभागातील केवळ 7 बेड सुरु असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. तसेच त्या 42 कर्मचार्यांचाही विषय काढला. यावेळी नगरसेवक मदन कारंडे, रवि माने, शशांक बावचकर, महादेव गौड यांनी आक्षेप घेतला. तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी अतिदक्षता विभागातील सोयी दाखवतो चला असे आमदार आवाडेंना सांगितले. यावेळी आमदार व नगरसेवकांमध्ये काही काळ वादावादी झाली. अखेर पालकमंत्र्यांनी मध्यस्ती करत वादावर पडदा टाकला.