उचगाव / वार्ताहर
उचगाव (ता. करवीर) येथील स्वागत कमानी जवळ असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एटीएम मशीन सह साहित्यांचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उचगाव स्वागत कमानीजवळ एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. सोमवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रथम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून एटीएम रूममध्ये प्रवेश केला. एटीएम मशीनच्या स्क्रीनच्या वरील बाजूस असलेले लाँक तोडण्याचा प्रयत्न केला. मशीनचे ब्युटीडोअर उचकटून डिस्पेंसर तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली. एटीएम मशीन सह सीसीटीव्ही कॅमेरा मिळून 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद मशीनची देखभाल दुरुस्ती करणारे अमोल वसंत साठे रा. जिवबा नाना पार्क कोल्हापूर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम करत आहेत.