कबनूर / वार्ताहर
कबनूर (ता. हातकणंगले) येथील दत्तनगर परिसरातील एका घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या अंगणवाडी सेविका कांचन स्वामी (वय-35) या महिलेचा आज, रविवारी सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याने कबनूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कबनूर येथील दत्तनगर गल्ली नंबर 11 मध्ये राहणाऱ्या कांचन संजय स्वामी या एकात्मिक बाल विकास प्रकल्प हातकणंगले प्रकल्प दोन मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत होत्या. त्या मुलांच्या सह सिद्रा या नरसप्पा अथणी यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटविताना अचानक गॅसचा मोठा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने इचलकरंजी येथील आय. जी एम मध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र अखेर पाचव्या दिवशी त्यांचा त्यांचा मृत्यू झाला.
स्फोटात घराच्या भितींना तडे जावून छताचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. घरासह प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.