पुलाची शिरोली / प्रतिनिधी
कमी किंमतीत सोने देतो असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या हालोंडीच्या( ता.हातकणंगले) ‘डीजे’ ला धनादेश बाऊन्स प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणात तक्रारदार पुढे न आल्याने आणि डीजे हालोंडीतून बाहेर गेल्याने हा तपास थांबला होता. पण सोने देऊ शकत नसल्याने डीजेने तक्रारदारांना चेक देऊन स्वतःवरची कारवाई टाळली होती. मात्र यातीलच एका तक्रारदाराने धनादेश बाऊन्स प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे डीजेवर वॉरंट काढण्यात आले होते. अखेर डीजेला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या सासरवाडीतून शनिवारी ताब्यात घेतले. डीजेने सुमारे पंधरा जणांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे आणि सोने दोन्ही पैकी काहीच मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत. कमी किंमतीत सोने खरेदी करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गोळा केली. त्यामुळे तुमचीच उलटी चौकशी लावतो असे सांगून संबंधित व मध्यस्थी गुंतवणूकदारांना जानेवारी २०१९ पासून डीजे टोलवत होता.
याबाबतची माहिती अशी, हालोंडी येथील डीजेने तेथीलच एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन औद्योगिक वसाहतीमध्ये छोटा व्यवसाय सुरू केला. यातून तो एका बँक अधिकाऱ्याच्या संपर्कात आला. या ओळखीतून त्याला बँक लिलावातील सोने कमी किंमतीत मिळाले. हेच सोने त्याने संबंधित खासगी सावकाराला दिले. त्यामुळे त्याचा गैरप्रसार सूरू झाला. यातून काहींनी स्वतःहून त्याच्याकडे रक्कम देत पुढच्या लिलावातील सोने आम्हाला दे असे सांगितले. याचा गैरफायदा घेत डीजेने गुंतवणूकदारांच्या संबंधित व्यक्तिंना गंडा घालण्यास सुरुवात केली. हालोंडी व हेरले येथील सुमारे पंधरा जणांनी कमी किंमतीतील सोने मिळविण्यासाठी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समजते
.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कोठून आली म्हणून आपली पोलिसांकडून चौकशी होईल या भीतीने ते केवळ मध्यस्थीच्या माध्यमातून आपले पैसे किंवा सोने परत मिळेल या आशेवर ते आहेत. यातीलच एका व्यक्तीला धनादेश देऊन त्याने फसवले. आणि तो बाऊन्स केल्याच्या गुन्ह्यात तो न्यायालयाकडून पोलिसांच्या ताब्यात आला. त्याला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले हे कळल्यावर त्याच्याकडून फसवणूक झालेल्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. अडीच – तीन वर्षांपासून गुंतवणूकदारांना गुंगारा देणार्या डीजेकडून आतातरी आपली रक्कम परत मिळेल या आशेवर लोकांनी पोलिस ठाण्यात उपस्थिती लावली. यामुळे पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.