प्रतिनिधी/ काणकोण
किनारा नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून काणकोण नगरपालिका क्षेत्रातील कोळंब येथील सर्व्हे क्र. 80/1 या किनाऱयालगतच्या जमिनीत अनधिकृतपणे उभारलेली 8 आस्थापनांची एकूण 77 कुटिरे आणि 6 उपाहारगृहे दक्षिण गोव्याच्या अतिक्रमणे हटविण्याच्या पथकाने हटविली.
त्यासाठी काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल, सीआरझेडचे अधिकारी देवेंद्र नाईक आणि अन्य, पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क, दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानकांतील निरीक्षक तुकाराम चव्हाण, रवी देसाई, दीपक पेडणेकर, 150 पेक्षा अधिक पोलीस, काणकोण पालिकेचे कामगार, वीज, बांधकाम विभागांचे अभियंते तसेच कर्मचारी आणि जेसीबी असा ताफा या कामासाठी वापरण्यात आला.
किनाऱयालगत उभारण्यात आलेली ही बांधकामे हटविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला होता. त्यानुसार मागच्या वर्षी काही बांधकामे या व्यवहारांत गुंतलेल्यांनी स्वतःहून हटविली होती. पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांकडून यासंबंधी नोटीस देण्यात आलेली असली, तरी कारवाईच्या पहिल्या दिवशी देखील बांधकामे हटविण्याच्या मोहिमेबद्दल काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने गुप्तता बाळगली. मात्र याची कुणकुण लागताच बऱयाच व्यावसायिकांनी आपली आस्थापने स्वतःहून हटविली. त्यामुळे या मोहिमेत विशेष कारवाई करावी लागली नाही.
हंगामी आस्थापने दरवर्षी पर्यटन हंगामात उभारल्यानंतर हंगाम संपला की, स्वतःहून हटवायची असतात. मात्र या ठिकाणी सर्वत्र पक्की बांधकामे उभारण्यात आली होती. यामुळे या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कोरोना महामारीमुळे मार्चपासून पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला असून ऑक्टोबरपासून या व्यवसायाला जरी प्रारंभ झालेला असला, तरी काणकोण पालिकेने अजून या व्यावसायिकांना परवाने दिलेले नाहीत. सध्या शनिवारी आणि रविवारी देशी पर्यटक या भागात येत असले, तरी अजून व्यवसायाचा जम बसलेला नाही. पर्यटकांच्या स्वागताची तयारी करण्याच्या गडबडीत असतानाच सर्व आस्थापने भुईसपाट करण्यात आल्यामुळे या व्यवसायातील व्यावसायिकांची स्थिती बिकट झालेली आहे, अशा प्रतिक्रिया काही जणांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या. यापुढील कारवाई आगोंद पंचयातीमधील धवलखाजन किनाऱयावर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.