दिल्ली, न्यूयॉर्क, हेग : वृत्तसंस्था
कोरोनामुळे जगभरात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असून, कोविड 19 च्या सावटाखालीच यंदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल पद्धतीने योगदिन साजरा करण्यात येत आहे. घरात आणि कुटंबीयांसोबत योग ही यंदाची थिम असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तर दुसऱया बाजूला ‘कोविडमुळे लोकांमधील एकटेपणा व अस्वस्थता वाढत असताना काळात योगपूरक जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे,’ असे मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे अध्यक्ष तिजानी मोहम्मद बंदे यांनी येथे व्यक्त केले आहे.
21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. 193 देशांपैकी 175 देशांनी याला पाठिंबा दर्शविला होता. डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली. यंदाच्या योगदिनावर मात्र कोरोनाचे सावट आहे. मात्र, तरीही वेगवेगळय़ा माध्यमातून जगभर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘घर पर योग और परिवार के साथ योग’ या वर्षीची थिम राहणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून डिजिटल माध्यमातून लोकांना यात सहभागी होता येणार आहे. यानिमित्त शेकडो लोक सूर्यनमस्कार करतील व हा दिवस सत्कारणी लावत निरोगी व निरामय जीवनाचा जागर घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रसारण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधानांच्या योगसंदेशाबाबत औत्सुक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगदिनाच्या कार्यक्रमात दरवर्षी हिरिरीने सहभाग होतात. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील योगाचरणाबाबतही ते आग्रही असतात. यंदा कोरोना संकटात ते या विषयावर काय संदेश देणार, याबाबत औत्सुक्य असेल. योगगुरू रामदेवबाबा हेही मागच्या अनेक वर्षांपासून योग व आयुर्वेद या दोन क्षेत्रांत भरीव योगदान देत आहेत. किंबहुना, यंदा डिजिटल योगावरच सगळय़ांचा भर राहणार आहे.
नेदरलँडच्या सुरक्षामंत्र्यांचा ऑनलाईन योगात सहभाग
दुसरीकडे भारतीय दुतावासाद्वारे होणाऱया ऑनलाईन अंांतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात नेदरलँडचे सुरक्षामंत्री अंक बीजलेवेल्ड हेदेखील सहभागी होणार आहेत. भारताकडून जगाला योग ही देणगी मिळाली आहे. त्याबद्दल भारताचे आभार. नेदरलँडची सेना मागच्या 15 वर्षांपासून योगाभ्यास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडच्या संकटात योगातूनच स्वस्थता : युनो महासभा अध्यक्ष
यंदा कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध व फिजिकल डिस्टन्सिंगच्या पार्श्वभूमीवर हा दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सद्य:स्थितीत माणूस माणसापासून दूर गेला असून, एकटेपणा वाढत आहे. अनेकांना आर्थिक संकटांशीदेखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांचा त्रास वाढत आहे. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे प्रियजनांची चिंता अशा दुष्टचक्रात लोक अडकले आहेत. अशावेळी आपण शारीरिक व मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणे गरजेचे असून, योगातूनच हे शक्य होईल, असे युनो महासभेचे अध्यक्ष तिज्जानी मोहम्मद बंदे म्हणाले.