नवी दिल्ली
दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचून घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहून आपल्याला भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ऐवजी सिरमची ‘कोव्हिशिल्ड’ लस देण्यात यावी अशी मागणी केली आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे डॉक्टरांच्या मनात चिंता आहे, असे आरएमएल रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले.
भारतात सध्या सिरम इन्स्टिटय़ूटने उत्पादन केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. त्यात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस आहे, तर ‘कोव्हिशिल्ड’ ही ऑक्सफर्डने विकसित केलेली लस आहे. भारतात सीरम इन्स्टिटय़ूट या लसीचे उत्पादन करत आहे. काही दिवसांपूर्वी ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींच्या परिणामकारकतेवरुन दोन कंपन्यांच्या प्रमुखांमध्येच वाद झाला होता.