नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना लसीकरण व्यवस्थापनासाठी भारताने तयार केलेले को-विन हे ऍप जगभरात चर्चिले जात असून लवकरच ते जगासाठी खुले केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी को-विन विश्व मंचाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ही घोषणा केली. अनेक देशांनी या ऍपमध्ये स्वारस्य दाखविले आहे.
हे ऍप साऱया जगाला देण्यासाठी भारत बांधील आहे. जगातील कोणतेही राष्ट्र, मग ते कितीही बलवान असो, कोरोनाशी संघर्ष एकटय़ाच्या जीवावर करू शकत नाही, ही बाब आता अनुभवाअंती पुरेशी सिद्ध झाली आहे. भारताने हे आधीपासूनच ओळखले होते. त्यामुळे कोरोना उद्रेकाचा प्रारंभ झाल्यापासूनच भारताने आपला सर्व अनुभव जगाला देण्याचे धोरण ठेवलेले आहे. म्हणूनच को-विन जगासाठी मोकळे करण्याचा निर्णय झाला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तंत्रज्ञानाचा आधार
भारताने कोरोनाशी संघर्ष करताना प्रथमपासूनच तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. सॉफ्टवेअर्स विकसीत करण्यात आली आहेत. सॉफ्टवेअर्ससाठी सोर्स किंवा स्रोताची अडचण येत नाही. त्यामुळे कोरोनाचा पाठपुरावा करणे आणि लक्ष ठेवणे यासाठी जे ऍप विकसीत करण्यात आले आहे, ते तंत्रवैज्ञानिकदृष्टय़ा शक्य होईल तितके खुले ठेवण्यात आले आहे. सारे जग एकच आहे, अशी आमच्या संस्कृतीची शिकवण आहे. या शिकवणीला अनुसरून आम्ही आमची सर्व वाटचाल करीत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या भाषणात स्पष्टपणे केले.
50 देशांना स्वारस्य
को-विन या भारतीय ऍपचा उपयोग करण्यात जगातील 50 देशांनी स्वारस्य दाखविले आहे. या देशांमध्ये कॅनडा, मेक्सिको, नायजेरिया, पनामा, युगांडा इत्यादी देशांचा समावेश आहे. ही माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकारणाचे (एनएचए) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.