सातारा / प्रतिनिधी :
तक्रारदार यांना विहीरीचे काम करुन देण्यास मदत करण्यासाठी तसेच मौजे पारगाव खंडाळा येथील बंदिस्त गटाराच्या केलेल्या कामाचे डिपॉझिट परत मिळवुन देण्यासाठी व कामाच्या बिलाची टक्केवारी अशी एकूण 60 हजार रुपयांची लाच स्विकारताना एकजण रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.
याप्रकरणी खंडाळा पंचायत समितीचे शाखा अभियंता भोसले (पुर्ण नाव माहित नाही), पारगाव खंडाळ्याचे ग्रामसेवक भाऊसाहेब गजानन सस्ते व खाजगी कॉन्ट्रक्टर अंबादास रामराव जोळदापके या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शाखा अभियंता भोसले मिळून आला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, तक्रारदार यांना मिळालेल्या विहीरीचे काम करुन देण्यास मदत करण्यासाठी तसेच मौजे पारगाव खंडाळा येथील बंदिस्त गटार करण्याच्या केलेल्या कामाचे डिपॉझिट परत मिळवुन देण्यासाठी तसेच सदर कामाच्या बिलाचे ग्रामसेवक सस्ते यांनी स्वतःसाठी 5 टक्के व शाखा अभियंता भोसले यांचेसाठी 5 टक्के असे एकुण 10 टक्के प्रमाणे 60 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबतची लेखी तक्रार तक्रारदार यांनी दि. 2 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार दि. 3 रोजी तक्रारीची पडताळणी करुन दि. 10 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. त्यामध्ये ग्रामसेवक सस्ते व शाखा अभियंता भोसले यांनी मोबाईल फोनवरुन खाजगी कॉन्ट्रक्टर अंबादास रामराव जोळदापके (रा. नांदेड सिटी, पुणे) यांना स्विकारण्यास संमती दिली. त्यानुसार जोळदापके यांनी लाचेची रक्कम जिल्हा परिषद साताराच्या गेटजवळ स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात जोळदापके यास लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक सस्ते यांना ताब्यात घेण्यात आले असून शाखा अभियंता भोसले हे मिळुन आले नाहीत. त्यांच्या विरूध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्पे, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक फौजदार आनंदराव सपकाळ, पोलीस हवालदार भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुखे, पोलीस नाईक संजय अडसुळ, प्रशांत ताटे, श्रद्धा माने, पोलीस काँन्स्टेबल संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, शितल सपकाळ, चालक पोलीस नाईक मारुती अडागळे यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, विभाग, सि.स.नं 524/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदरबझार सातारा येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02162/238139 वर तसेच हेल्प लाईन क्रमांक 1064 वर तसेच व्हॉट्सऍप नंबर 7875333333 तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.