गडकोट मोहिमेत सहभागी व्हा, संभाजी भिडे गुरुजी यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या विचारांची पिढी घडविली जात आहे. पुढील शेकडो वर्षे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे विचार या समाजासाठी प्रेरणादायी रहावेत यासाठीच स्वराज्याच्या राजधानीत 32 मण सुवर्ण सिंहासन उभारले जात आहे. या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी ‘खडा पहारा’ योजना आखण्यात आली आहे. हे एक शिवकार्य असून त्यामध्ये शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.बेळगावमधील धारकऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी भिडे गुरुजी बेळगावमध्ये आले होते. अनसुरकर गल्ली येथील छत्रे वाडय़ात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रायगडावर प्रत्येक शिवभक्ताला सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शिवभक्तांनी खडा पहारा या योजनेसाठी नाव नोंदणी करून या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भिडे गुरुजेंनी केले.
तरुणाई भरकटत चालली आहे. व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्य बरबाद करीत आहेत. यामुळे या तरुणाईला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी शिवप्रतिष्ठान उपक्रम राबवित आहे. दुर्गामाता दौड, गडकोट मोहिमेतून चांगल्या सवयी लागून इतिहासाची जाण होत आहे. आता देश रक्षणासाठी युवा पिढी सज्ज केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.