अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ : प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागे : गाव कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील अबनाळी गावातील 144 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली असून यामुळे तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. काही दिवसांपूर्वी या गावात सर्दी, पडसे, ताप, जुलाबाची साथ आली होती. त्यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने अबनाळीला भेट देऊन सर्वांची आरोग्य तपासणी करून गोळय़ा, औषधे दिली. त्यावेळी गावातील एकूण 240 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 144 जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. यामुळे तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पाटील, व्ही. एस. अवटी आदांनी तातडीने अबनाळीला जाऊन परिस्थितीची पाहणी केली. गावकऱयांना कोरोनाविरुद्ध कोणती दक्षता घ्यावी, याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार यांनीही खानापूरला तातडीने भेट देऊन तहसीलदार कार्यालयात संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची सूचना दिली.
अबनाळीतील गावकऱयांनी एप्रिलच्या सुरुवातीस एका विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरल्याने गावातील बऱयाच लोकांना ताप व सांधेदुखीचा त्रास झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आरोग्य खात्याने जवळपास 250 जणांची तपासणी व त्यांच्यावर उपचार केले होते. आता ते सर्वजण या आजारातून बरेही झाले आहेत. पण त्यावेळी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तब्बल 15 दिवसांनी मिळाला. त्यामध्ये 144 जण पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. या संदर्भात गावातील कुणालाही माहिती नव्हती. मंगळवारी सकाळी गावात आरोग्य खात्याचे अधिकारी पोहोचल्यावरच गावकऱयांना याची माहिती मिळाली. पण आम्ही सर्वजण आता बरे आहोत, असे असताना अहवाल पॉझिटिव्ह कसा येतो, असा संभ्रम गावकऱयांत निर्माण झाला. त्यांना समजावणे आरोग्य अधिकाऱयांनाही कठीण झाले. गावकऱयांना पॉझिटिव्ह अहवाल मिळताच त्यांच्यात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी आरोग्य अधिकाऱयांना या संदर्भात जाब विचारला. त्यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱयांनी त्यांच्यावर दंडुकेशाहीचाही प्रयत्न केला. पण काही वेळाने वातावरण शांत झाले.
गावात भीतीचे वातावरण
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गावातील लोक आजारी पडले आणि ते बरेही झाले. यामुळे गावात दोन दिवसांपूर्वी एक विवाह समारंभही झाला होता. एकाच वेळी एवढय़ा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील, याची कुणालाही कल्पना नव्हती. मंगळवारी सायंकाळी पुन्हा तहसीलदार, आरोग्य खात्याचे अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱयांनी अबनाळी गावाला भेट देऊन ते गाव कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. गावात मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, शुद्ध पाणी पिणे तसेच दिलेली औषधे घेऊन कोरोनावर मात करण्याचा सल्ला यावेळी अधिकाऱयांनी गावकऱयांना दिला. तसेच शिरोली ग्रामपंचायतीलाही याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली. मात्र अचानक आलेल्या पॉझिटिव्ह अहवालामुळे अबनाळी गावात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
18 जुलै 2020 रोजी तालुक्यात पहिला रुग्ण
दरम्यान, गेल्यावर्षी दि. 24 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला होता. त्यावेळी बेळगाव जिल्हय़ातील जवळपास सर्व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडले होते. पण खानापूर तालुका मात्र त्याला अपवाद ठरला होता. पण दि. 18 जुलै 2020 रोजी तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर मात्र जवळपास तीन महिने खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली होती. त्यावेळी नंदगडजवळील संगोळ्ळी रायण्णा वसतिशाळेमध्ये कोरोना हॉस्पिटलही उघडण्यात आले होते. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तालुक्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आली. यामध्ये बरेच लोक दगावलेही होते. मात्र यंदा जिल्हय़ात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्याचे खानापूर तालुक्यातही आता लोळ पसरले आहे.
176 कोरोनाचे सक्रिय रुग्ण
अबनाळी गावात सापडलेल्या 144 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसह तालुक्यात एकूण 176 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आता प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार यांनी मंगळवारी येथील तहसीलदार कार्यालयात तालुकास्तरीय अधिकाऱयांची बैठक घेऊन उपयुक्त सूचना केल्या आहेत. प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असल्याने कोण मास्क वापरत नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, भाजीमार्केट, फळफळावळ मार्केट यामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी थोडय़ा दिवसासाठी भाजीमार्केट, फळमार्केट मुख्य रस्त्यावर न ठेवता ते खुल्या मैदानावर हलवावे, तसेच गर्दी टाळावी, सार्वजनिक समारंभ, लग्न, मुंज यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन करण्यात यावे, आदी सूचनांचा त्यामध्ये समावेश केला आहे.