वार्ताहर / कास :
खिरखंडी (ता. जावली) येथील मुलींच्या शिक्षणासाठीची धावपळ व विदारक परिस्थिती सर्वांच्या समोर आल्यानंतर प्रशासनासह सर्वजण कामाला लागले. पण या मुलींचा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे त्या अत्यंत असुरक्षित अशी लाकडाची होडी चालवत येत. या मुलींना कोयना विभागाचे सुपुत्र बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चाने दररोज कोयना जलाशय पार करण्यासाठी यांत्रिक बोट उपलब्ध करून दिली आहे.
दि. 20 जानेवारीच्या ‘तरुण भारत’मधून खिरखंडीतील मुलींच्या शिक्षणाबाबतची दुरवस्था मांडली होती. या वृत्तानंतर इतर माध्यमांनी हा विषय उचलून धरल्याने मुंबई उच्च न्यायालयालाही या मुलींची दखल घ्यावी लागली. दुर्गम बामणोली खोऱ्यातील खिरखंडी गावातून कोयना जलाशय पार करत पुन्हा अंधारीपर्यंत चार पाच किलोमीटरचा घनदाट जंगलातील प्रवास करत या मुली शाळेत पोहोचत होत्या. ही परिस्थिती पाहून नुकतेच आपल्या मूळ दरे या गावी आलेल्या मंत्री एकनाथ शिंदे, व खासदार श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ या मुलींना रोज शाळेत कोयना जलाशय पार करून सकाळी आणि संध्याकाळी सोडणे यासाठी एक यांत्रिक बोटी उपलब्ध करून दिली. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष खिरखंडीला भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या कामामुळे मुलींचा रोजचा होडी चालवण्याचा त्रास कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुलींना फायबर बोट उपलब्ध करून दिली जाणार आहे, तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लाइफ जॅकेट उपलब्ध करून दिली आहेत. पण सर्वांच्या अगोदर यांत्रिक बोट उपलब्ध करून दिल्याने या मुलींची मोठी अडचण दूर झाली आहे.