बेळगाव : केवळ दोन हजारांसाठी येळ्ळूर रोड, वडगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ऑटो रिक्षा स्टॅण्डसमोर सोमवारी सकाळी 9.15 वाजता गवंडी कामगाराचा खून करण्यात आला. खून झाल्यानंतर काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
मयत महादेव मारुती जाधव (वय 50, मूळचा रा. आंबेवाडी, सध्या रा. हमालवाडा भारतनगर, सहावा क्रॉस, शहापूर) यांचा संशयित आरोपी सूरज पुंडलिक केदारीचे (वय 35, रा. नाझर कॅम्प, वडगाव) याने कटरने हल्ला करून खून केला होता. या घटनेमुळे वडगाव परिसरात खळबळ उडाली होती. मंगाई देवीच्या यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशीच हा खून झाला. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्यानंतर शहापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
संशयित आरोपीवर गुन्हा नोंदवून शहापूर पोलिसांनी तिसरे जेएमएफसी न्यायालयासमोर हजर केले. सूरज याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.