तक्रारीसाठी मोबाईल क्रमांकासह लावणार फलक
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, कोटय़वधी निधी खर्चूनही स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही. स्वच्छतेबाबत कुणाला संपर्क साधायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छता निरीक्षक, मुकादम, कंत्राटदार यांच्या माहितीचे फलक वॉर्डमध्ये लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुकादम व सुपरवायझरच्या नावांची यादी सादर करण्याची नोटीस कंत्राटदारांना बजावण्यात आली आहे.
आगामी वर्षभराच्या कालावधीसाठी 45 कोटींच्या निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्वच्छतेचे काम करण्यासाठी महापालिकेकडून कोटय़वधी निधी खर्च केला जातो. तरीदेखील शहरातील स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. केवळ घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. पण रस्त्याशेजारी किंवा खुल्या जागेत साचलेल्या कचऱयाची उचल करण्यास कंत्राटदार टाळाटाळ करीत आहेत. साचलेल्या कचऱयाची उचल करण्यासाठी कुणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न नागरिकांना भेडसावतो. हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार केली असता दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांची धावपळ होते. कचरा कुजून दुर्गंधी पसरली तरी कचऱयाची उचल केली जात नाही. त्यामुळे कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे. कचरा उचल करण्यासाठी निविदा काढल्या जातात. याकरिता कंत्राटदाराला वर्षाला कोटय़वधीची बिले अदा करूनही स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे कंत्राटदाराला नोटीस बजावण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. स्वच्छतेच्या कामाप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व कंत्राटदारांना नोटीस बजावली असून, प्रत्येक वॉर्डमध्ये काम करणाऱया स्वच्छता निरीक्षकाचे नाव, मुकादम, सुपरवायझर आदी सर्वांच्या मोबाईल क्रमांकांसह नावांची यादी देण्याची सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये फलक लावण्याची सूचना करण्यात आली आहे.
बहुतांश वेळा कचऱयासंदर्भात तक्रार केली असता कोणता वॉर्ड आहे, स्वच्छता निरीक्षक कोण? कंत्राटदार कोण, अशी विचारणा महापालिकेकडूनच केली जाते. अशा वेळी माहिती सांगणे नागरिकांना अवघड बनते. त्यामुळे तक्रार कोणाविरोधात करायची, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता निरीक्षक, मुकादम, सुपरवायझर आणि कंत्राटदार आदींच्या नावांचा फलक मोबाईल क्रमांकांसह लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली आहे.