चिपळूण
शहराला लागूनच असलेल्या खेर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील थ्री एम पेपर मिलमधील कामगारांच्या पगारासाठी कंपनीच्या व्यवस्थापकाने तिघांच्या खात्यावर जमा पेलेली 12 लाख 53 हजार 249 रुपये इतकी रक्कम त्यांनी परस्पर हडप केल्याची घटना घडली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी व्यवस्थापकाने चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ यादव, रवी यादव, पंकज यादव (सर्व-उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापक बादल शांतीलाल शहा (खेर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार थ्री एम पेपर मिलमधील कामगारांच्या पगारासाठी त्यांनी वरील तिघांच्या बँक खात्यावर 12 लाख 53 हजार 249 रुपये इतकी रक्कम जमा केली होती. मात्र या तिघांनी ही रक्कम कंपनीतील कामगारांच्या पगारासाठी न वापरता स्वत:च हडप केली. हा प्रकार 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत घडला आहे.
अपहाराचा हा प्रकार व्यवस्थापक शहा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समेद बेग करीत आहेत.