प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे सातारा जिल्हय़ात कोरोनाची रुग्ण संख्या हळूहळू वाढत असताना प्रशासनावर प्रचंड ताण आलाय. मात्र काही सातारकरांचा येडेपणा काही जात नाही. दुचाकी घ्यायची आणि मोकळय़ा रस्त्यावर उगीचच फिरायचे. अशा गांभीर्य नसणाऱया युवकांची शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. राधिका रस्त्यावर हॉटेल सेनॉर चौकात एका तासात 50 पेक्षा अधिक दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.
मंगळवारी दुपारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे राधिका रस्त्यावर आपल्या पथकासह पेट्रोलिंग करीत असताना रस्त्यावरून विनाकारण अनेक युवक दुचाकीवरुन येजा करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हॉटेल सेनॉर चौकात त्यांनी अचानक वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. शाहूपुरी पोलिसांनी अचानक घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱया युवकांची चांगलीच तंतरली.
दुचाकी थांबवून युवकांकडे विचारणा सुरु केली. त्यातील युवकांनी पोलिसांना खोटे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना चांगलाच काठीचा प्रसाद दिला. अनेक युवकांनी तर 2015-16 सालचे ओळखपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला. यावरील तपासणी दरम्यान दुचाकी एकाची, परवाना दुसऱयाचा तर ओळखपत्र तिसऱयाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर अशा युवकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली. या तपासणी अनेक जण याच मार्गावरून चारचाकी वाहनातून प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले. अशा सर्व वाहने थांबवून वाहनांची कागदपत्रे, वाहनांमधील बसलेली लोक कुठे निघाले आहेत? याबाबतची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच ते वाहन सोडण्यात येत होते.
युवकाने घातले लोटांगण
कारवाईदरम्यान एका युवकाने खोटे ओळखपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला. ओळखपत्राची खातरजमा केली असता ते तीन वर्षापूर्वीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरच त्याची चांगलीच धुलाई केली. आपण खोटे पडल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित युवकाने रस्त्यावरच पोलिसांसमोर लोटांगण घालून माफी मागण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला व त्याच्यात दुचाकीला शाहुपुरी पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कारवाई केली.