वृत्तसंस्था/ टय़ुरिन
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने युवेंट्स फुटबॉल क्लबला निरोप दिला असून आता तो मँचेस्टर युनायटेड संघामध्ये दाखल होणार आहे.
चॅम्पियन्स लीग आणि सिरीए फुटबॉल स्पर्धेंचे जेतेपद मिळविणाऱया युवेंट्स फुटबॉल क्लब बरोबर रोनाल्डोचा तीन वर्षांचा करार संपुष्टात आला. रोनाल्डोने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर युवेंट्स क्लबला अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून दिल्या. इटालियन फुटबॉलमध्ये युवेंट्स क्लब दर्जेदार म्हणून ओळखला जातो. रोनाल्डोने आता मँचेस्टर युनायटेड क्लबशी करार केला आहे. यापूर्वी मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळताना रोनाल्डोने 292 सामन्यांत 118 गोल नोंदविले आहेत. रोनाल्डोने वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत पाचवेळा ‘बोलोन डी’ ओरचा पुरस्कार मिळविला असून त्याने आतापर्यंत किमान 30 प्रमुख ट्रॉफीज जिंकल्या आहेत.