माजी नगरसेवक व अन्य नागरिकांनी पुढाकार घेऊन केलेली सफाई, रस्त्यांच्या बाजूला मातीचे ढिगारे पडून, शॅडो कौन्सिलकडून दखल
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील नाले, गटारांची साफसफाई करण्यास पालिकेला अपयश आल्याने काही माजी नगरसेवक व नागरिकांकडून पुढाकार घेऊन गटारे व नाल्यांची साफसफाई करण्यात आली. मात्र या सफाईनंतर रस्त्यांच्या कडेला काढून ठेवण्यात आलेल्या गाळवजा मातीचीही पालिकेकडून उचल होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मडगावातील स्टेशन रोडवर रस्त्याच्या नजीक घर असलेल्या ऍड. नॉर्टन फर्नांडिस यांनी कमलाकर नाईक यांचे दुकान ते बाटा शोरूमदरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराची उपसणी केली. सुरुवातीस पालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिक आमदार दिगंबर कामत यांना साकडे घातल्यावर कामत यांनी काही कामगार पुरविले होते. मात्र आणखी काही कामगार आवश्यक असल्याने स्वतःच्या खिशातून 25 हजार खर्चून आपण सदर साफसफाई करून घेतल्याची माहिती ऍड. फर्नांडिस यांनी दिलेली आहे, असे शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.
पालिकेकडून सदर गाळवजा माती उचलण्यास टाळाटाळ होत असून त्यामुळे पुन्हा माती गटारात जात असल्याने केलेले काम पाण्यात जाण्याची व येथे पूरसदृश स्थिती उद्भवण्याची भीती ऍड. फर्नांडिस यांनी व्यक्त करून शॅडो कौन्सिलला यात लक्ष घालण्याची विनंती केली. आपण पालिका अभियंता सुरेंद्र गावकर यांचे याकडे लक्ष वेधले असून पालिकेला न जमलेले काम नागरिकांनी स्वतःचे पैसे फेडून केल्यानंतर किमान गाळवजा माती त्वरित उचलण्यासाठी तरी पावले उचलावीत असे त्यांना सांगितलेले आहे, असे कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.
काही नगरसेवक शॅडो कौन्सिलने मान्सूनपूर्व कामे अडविल्याचा अपप्रचार करत असल्याचे आम्हाला कळून चुकले आहे. मात्र निविदा काढताना कामांच्या अंदाजित खर्चाची रक्कम एकच ठेवण्यात आल्याने यात घोळ असल्याची खात्री पटून पालिका संचालकानी ही मान्सूनपूर्व कामे स्थगित ठेवायला लावली आहेत, असे कुतिन्हो यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.