करवीर शिवसेनेची मागणी
उचगांव /प्रतिनिधी:
गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमावा या मागणीचे निवेदन शंभूराजे देसाई गृह (ग्रामिण), वित्त नियोजन राज्य मंत्री यांना करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापडाची बाजार पेठ आहे. कापडासह इतर वस्तूंची ही प्रमुख बाजार पेठ आहे. तसेच उचगाव हे ५० हजार लोक संख्येचे गाव असून गडमुडशिंगीची ही लोक संख्या मोठी आहे. गांधीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणारी सर्व गावे मोठी असून कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या या गावामध्ये चोऱ्या, दरोडे, खून असे प्रकार वारंवार घडतात. गांधीनगर मध्ये अपहरणाच्या घटना घडल्या असून लहान मुलांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच ह्या पोलीस स्टेशन हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग हा ही जात असून, जवळच रेल्वे स्टेशन आहे.लगतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत आहे. त्यामुळे एखादी मोठी घटना घडल्यानंतर अनुभवी अधिकारी ती हाताळू शकतो, म्हणून गांधीनगर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दर्जाचा अनुभवी व जुना अधिकारी इनचार्ज म्हणून देण्यात यावा. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा.शंभूराजे देसाई गृह(ग्रामिण),वित्त नियोजन राज्यमंत्री यांना देण्यात आले.मंत्री महोदयांनी पुढील कार्यवाही लवकरच करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुकप्रमुख पोपट दांगट, सुरेश वारके, युवासेनेचे प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.