पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान सूर्योदय योजनेचा शुभारंभ
वृत्तसंस्था / अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी गुजरातमध्ये 4 विकास योजनांचा शुभारंभ केला आहे. यात पेडिएट्रिक हार्ट हॉस्पिटल, गिरनार रोप-वे, अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयाचे मोबाईल ऍप फॉर टेलि-कार्डियोलॉजी आणि किसान सूर्योदय योजना सामील आहे. शेतकऱयांना रात्रीऐवजी सकाळी म्हणजेच 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत थ्री-फेज वीज मिळणार असून ही नवी पहाटच आहे. उर्वरित व्यवस्थेला धक्का न पोहोचविता वितरणाची नवी क्षमता तयार करून हे काम करण्यात येत असल्याने गुजरात सरकारचे अभिनंदन करतो, असे मोदींनी म्हटले आहे.
शेतीसाठी दिवसा वीज पुरविण्यासाठी गुजरात सरकारने अलिकडेच किसान सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱयांना सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत वीज मिळणार आहे. याकरता 2023 पर्यंत वितरण सुविधा तयार करण्यासाठी सरकारने 3,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पेडिएट्रिक हार्ट हॉस्पिटल युएन मेहता इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डियोलॉजी अँड रिसर्चशी संलग्न आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर संस्थेतील बेड्सची संख्या 450 वरून 1251 वर पोहोचणार आहे. हा देशातील सर्वात मोठा सिंगल सुपर स्पेशालिटी कार्डियक टीचिंग इन्स्टिटय़ूट ठरणार आहे.