ऑनलाईन टीम / गुरूदासपूर :
बीएसएफच्या जवानांनी आज सकाळी पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला. दरम्यान, यावेळी बीएसएफने केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6.45 वाजता पाकिस्तानी घुसखोर गुरुदासपूर सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते. यावेळी तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्यांना हटकले. मात्र, घुसखोरांनी त्याकडे दुर्लक्ष करत घुसखोरीचा प्रयत्न सुरूच ठेवला. यावेळी बीएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एक घुसखोर ठार झाला. गुरुदासपूरमधील बसंतर नाल्याजवळ ही घटना घडली. पाकिस्तानकडून येणाऱया दहशतवाद्यांनी आता पंजाब सीमेवर आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. रविवारी या भागात अज्ञात ड्रोनचा वावर आढळून आला होता.