बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एजे स्पोर्ट्स संघाने देसाई वॉरियर्स संघाचा 6 धावांनी तर गोकाक ग्लॅडिएटर्स संघाने आनंद अकादमी ड्रॉपीन वॉरियर्स संघाचा 16 धावांनी पराभव केला. अभिषेक निकम (एजे स्पोर्ट्स), हर्ष पटेल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एजे स्पोर्ट्सने 25 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. अभिषेक निकमने 1 षटकार, 6 चौकारांसह नाबाद 55, जीत गादियाने 29, कुशल कित्तूरने 23 तर विनायक पांडेने 11 धावा केल्या. देसाई वॉरियर्सतर्फे आकाश कुलकर्णीने 18 धावांत 2, अद्वैत साठे, आदित्य पाटील, वैभव लोहार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. त्यानंतर देसाई वॉरियर्सने 25 षटकांत 8 बाद 145 धावा केल्या. त्यात आकाश कुलकर्णीने 66, विराज हावेरीने 24, वेदांत पाटीलने 22 धावा केल्या. एजे स्पोर्ट्सतर्फे आदित्य खिलारेने 23 धावांत 2, लक्ष वर्णेकरने 29 धावांत 2, अभिषेक निकमने 43 धावांत 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात गोकाक ग्लॅडिएटर्स संघाने 23 षटकांत 9 बाद 122 धावा केल्या. त्यात सिद्धेश असलकरने 36, उबेद्दुला खानने 29, समर्थ पावलेने 21 केल्या. आनंदतर्फे पिटू गोहिलतने 22 धावांत 3, साईराज देसाईने 23 धावांत 2, कुणाल शानभागने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी ड्रॉपीन वॉरियर्सचा डाव 22.5 षटकांत 106 :धावात आटोपला. त्यात पीयूष गोहिलतने 28, उत्कर्ष शिंदेने 26, कुणाल शानभागने 16 केल्या. गोकाक ग्लॅडिएटर्सतर्फे हर्ष पटेलने 11 धावांत 5, सिद्धेश असलकर, आलेश निंबुवाले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मंजुनाथ मुन्नवळी, नरेंद्र गादिया, श्रीकांत अंबेकर, जयसिंह राजपूत यांच्या हस्ते अभिषेक निकमला तर दुसऱया सामन्यात अमोल दळवी, सुनील अष्टेकर, दीपक सुळेभावीकर, माधुरी शिंदे यांच्या हस्ते हर्ष पटेलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सोमवारचे सामने : 1) एक्सेस इलाईट हुबळी वि. देसाई वॉरियर्स, सकाळी 9.20 वाजता. 2) सीसीआय ब्ल्यू वि. आनंद अकादमी ड्रॉपीन वॉरियर्स, दुपारी 1.30 वाजता.