वार्ताहर/ घटप्रभा
गोकाक शहरातील फॉल्स रोडवरील वॉर्ड क्र. 19 मध्ये आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी तालुका आरोग्याधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी सांगितले. येथील बाप-लेकास कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या घर परिसरातील शंभर मीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून याची दखल घेत नगरपालिका आयुक्त शिवानंद हिरेमठ व नगरसेवकांनी बाधित भागास भेट देऊन खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन केले. तसेच नगरपालिकेच्या वतीने सतर्कता बाळगून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सदर दोघांना कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. यामुळे आरोग्य खात्यासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान बाधितांच्या कुटुंबातील 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.