अंतिम फेरीसाठी जोग, भूपाळी, सिरंजनी, मारवा यांचा समावेश : अंतिम फेरी 7 नोव्हेंबर रोजी
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदी चित्रपटांतील जुनी गाणी ही आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत. या गीतांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगामची उपांत्यफेरी रविवारी पार पडली. एकाहून एक सरस बहारदार गीते सादर करून स्पर्धकांनी रसिकांची मने जिंकली. एकूण सहा संघांपैकी चार संघ पुढील फेरीसाठी निवडण्यात आले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी प्रस्तुत व रसिकरंजन आयोजित गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम स्पर्धेची उपांत्यफेरी रविवारी पार पडली. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे सायंकाळी हा हिंदी गाण्यांचा नजराणा गायकांनी सादर केला. या कार्यक्रमाला तरुण भारत मीडिया पार्टनर तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल समुद्र होते. उपांत्य फेरीसाठी मारवा, कल्याण, बसंत, भूपाळी, जोग, सिरंजनी या संघांची निवड करण्यात आली होती. यापैकी चार संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
वंदेमातरम् गीताने सुरुवात
उपांत्य फेरीची सुरुवात जोग या संघाने केली. त्यांनी आनंदमठ या चित्रपटातील वंदेमातरम् या देशभक्तीपर गीताने उपांत्य फेरीची सुरुवात केली. यानंतर 1970 च्या दशकातील सदाबहार गाणी स्पर्धकांनी सादर केली. भवरा बडा नादान है, दिल तोडनेवाले, रिमझिम् के तराने, कान में झुमका अशी एकाहून एक सरस गाणी सादर करून स्पर्धकांनी रसिकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, संचालक अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, प्रा. अनिल चौधरी, रसिकरंजनचे सचिन पवार, मकरंद बापट, परशराम माळी, गुरू पेडणेकर, श्रेया हुद्दार, अनिल पाटील, भारती कित्तूर, गिरीधर कोसंदल, अशोक केळकर, आर. आर. कुलकर्णी, नितीन नेर्लेकर, स्वाती हुद्दार, नितीन कपिलेश्वरकर, सुरेश कणगले, विनायक जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया हुद्दार यांनी केले. अंतिम फेरी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम फेरीसाठी एकूण चार संघांची निवड करण्यात आली.त्यामध्ये जोग, भूपाळी, सिरंजनी व मारवा या संघांचा समावेश आहे.