क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सुपर सब इशान पंडिताने नोंदविलेल्या गोलमुळे एफसी गोवाने आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील आपल्या महत्वपूर्ण सामन्यात एटीके मोहन बागान संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर काल हा सामना खेळविण्यात आला.
मध्यंतराला उभय संघ गोलशून्य बरोबरीत खेळत होते. एटीके मोहन बागानसाठी एदू गार्सियाने गोल करून आघाडी घेतली होती. या निकालाने उभय संघांना समान एक गुण प्राप्त झाला. या दोन्ही संघांचे दुसरे व तिसरे स्थान अबाधित राहिले. एटीकेचे आता 11 सामन्यांतून 6 विजय, 3 बरोबरी व 2 पराभवाने 21 तर एफसी गोवाचे 12 सामन्यांतून 5 विजय, 4 बरोबरी व 3 पराभवाने 19 गुण झाले आहेत.
एफसी गोवा संघाला पहिल्या सत्रात वर्चस्व ठेवूनही गोल नोंदविण्यात मात्र अपयश आले. सामन्यातील पहिली धोकादायक चाल रचली ती मात्र एटीके मोहन बागान संघाने. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला रॉय कृष्णाने दिलेल्या पासवर डेव्हीड विलियम्सचा गोल करण्याचा यत्न एफसी गोवाच्या बचावफळीने उधळून लावला. त्यानंतरच्या खेळावर एफसी गोवाचे वर्चस्व राहिले.
प्रथम आठव्या मिनिटाला आल्बेर्तो नोगुएराच्या पासवर आलेक्सझांडर जेसुराजचा एक यत्न एटीकेने उधळून लावला तर दोनच मिनिटांनी सावियर गामा व जॉर्गे मेंडोंझाने यांनी संयुक्तपणे रचलेल्या नोगुएराने दिशाहीन फटका हाणला. त्यानंतर सोळाव्या मिनिटाला ब्रँडन फर्नांडिसच्या पासवर जॉर्गे मेंडोझाचा फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला.
सामन्याच्या 27 व्या मिनिटाला एटीके मोहन बागानची गोल करण्याची संधी एफसी गोवाचा गोलरक्षक नवीनकुमारने उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळली. यावेळी कार्ल मॅकहय़ुजने दिलेल्या पासवर प्रबीर दासचा फटका नवीनकुमारने अडविला. लगेच एदू गार्सियाच्या पासवर सुभाषिश बोसने मारलेला हेडर एफसी गोवाच्या गोलपोस्टला आदळला. पहिल्या सत्रातील शेवटच्या क्षणी एफसी गोवाच्या सावियर गामाचा फटका एटीकेचा गोरलक्षक अरिंदम भट्टाचार्यने अडविला.
दुसऱया सत्रात काही प्रमाणात एटीकेने खेळावर वर्चस्व ठेवले. दुसऱया सत्राच्या आरंभालाच एफसी गोवाच्या सॅरिटॉन फर्नांडिसची गोल करण्याची संधी गोलपोस्टला आदळून वाया गेल्यानंतर 75 व्या मिनिटाला एटीके मोहन बागानने आघाडी घेणारा गोल केला. एफसी गोवाचा बचावरक्षक जेम्स डोनाचीने एटीकेचा स्ट्रायकर रॉय कृष्णाला डी कक्षेच्या बाहेर धोकादायक पद्धतीने पाडल्याबद्दल रेफ्री अजित मितीने फ्रिकीक बहाल केली होती. यावेळी एदू गार्सियाने एफसी गोवाच्या बचावाची भिंत सहज फोडली आणि नवीनकुमारलाही लिलया चकविले आणि चेंडू जाळीत टोलविला.
एफसी गोव्याने या पिछाडीनंतर दोन बदल केले. प्रशिक्षक जुआन फॅरांडोने आलेक्सझांडर जेसुराजच्या स्थानावर स्पेनच्या इशान पंडिता आणि लॅनी रॉड्रिग्सच्या स्थानावर प्रिन्सटन रिबेलोला आणले. या बदलाचा परिणाम लवकरच झाला आणि पाचच मिनिटांनी इशान पंडिताने कॉर्नरवरून मिळालेल्या पासची अचुक संधी साधली आणि अरिंदमला भेदले व बरोबरी साधली. या बरोबरीनंतर एटीके मोहन बागानच्या झेवियर हर्नांडिसच्या क्रॉसवर मानवीर सिंगचा हेडर पोस्टला लागल्याने त्यांची विजयी गोल करण्याची संधी हुकली तर शेवटच्या क्षणी गोव्याच्या ऑर्तिजची गोल करण्याचीही संधी हुकली.