इमारतीच्या बांधकामासाठी होणार वापर
प्रतिनिधी /पणजी
‘नाबार्ड’ बँकेतर्फे राज्य सरकारला रु. 2891.15 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून गोवा दंत महाविद्यालय इमारतीच्या दुसऱया टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी ते कर्ज देण्यात आले आहे.
ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी म्हणजेच ‘आरआयडीएफ’ योजनेंतर्गत ती मदत मिळणार आहे. राज्य सरकार तसेच सरकारी महामंडळांना कमी खर्चात सहाय्य करण्यासाठी सुविधा विकास निधीची स्थापना केली आहे. दंत महाविद्यालयाची ‘स्टेट ऑफ आर्ट’ नवी इमारत बांधण्यात येणार असून हा निधी त्याकरीता वापरला जाणार आहे. गोमंतकातील जनतेच्या आरोग्य मानदंडात सुधारणा करण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार असून जनतेला दंत चिकित्सा व इतर दंत समस्यांसाठी चांगली सेवा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या बांबोळी येथे गोमेकॉसमोर दंत महाविद्याल हॉस्पिटल कार्यरत असून आता त्याचा मोठा विस्तार केला जाणार आहे. मोफत सेवा देत असल्याने रुग्ण वाढत आहेत व तेथे जागा अपुरी पडल्याने नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याच प्रकल्पासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून तो कर्ज स्वरुपात देण्यात येणार आहे.
दंत महाविद्यालात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांनाही तेथे जागा अपुरी पडते. त्यामुळे दुसऱया टप्प्यातील इमारत बांधकामाचा सरकारने विचार करून तसा प्रस्ताव नाबार्डकडे कर्जासाठी पाठवला होता. त्याला आता मान्यता मिळाली असून दुसरी इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.