प्रतिनिधी / मडगाव
गोवा महिला फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी तसेच दक्षिण व उत्तर गोवा समित्या बरखास्त करण्यात आल्याची माहिती गोवा महिला फॉरवर्डच्या राज्य समितीच्या अध्यक्षा ऍड. अस्मा सय्यद यांनी दिली आहे. लवकरच या सर्व समित्या नव्याने स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी या समित्या बरखास्त करण्यात आल्या असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले.
आपल्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने तसेच जिल्हा पातळीवरील समित्यांनी चांगली कामगिरी करताना राज्यातील महिला तसेच खास करून गृहिणींना भेडसावणारे मुद्दे नेहमीच उचलून धरले आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. महिलांवरील अत्याचार तसेच महागाईमुळे झळ पोहोचलेल्या गृहिणींचे प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारण्याचे काम महिला समित्यांनी केले. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने केल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. नव्याने स्थापन करण्यात येणाऱया समित्या सदर कार्य पुढे नेणार असल्याचे ऍड. सय्यद यांनी स्पष्ट केले.