प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्षाने ‘सेव्ह गोवा नाऊ’ या हॅशटॅगखाली सुरू केलेल्या मोहिमेत सर्व विरोधी पक्ष आणि नागरिकांनी सामील होऊन गोव्यातील समस्या देश आणि जागतिक स्तरावर नेऊन चर्चा करावी, असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले आहे. भविष्यात गोवा राखून ठेवायचा असेल, तर सर्वांनी एकत्र येऊन ही मोहीम यशस्वी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी सरदेसाई यांनी आतापर्यंत कित्येक ट्विट करून गोवा उद्या नव्हे, आजच वाचवून ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मोले वाचवण्यासाठी, म्हादई वाचवण्यासाठी, ओल्ड गोवा वाचविण्यासाठी एवढे नव्हे, तर स्थानिकांचे रोजगार वाचविण्यासाठी सर्वांनी आताच एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
गोव्याची स्वतंत्र अस्मिता राखून ठेवण्यासाठी ‘सेव्ह गोवा नाऊ’ ही मोहीम म्हणजे पहिले पाऊल असून गोव्याचे पर्यावरण, अर्थव्यवस्था, आरोग्य यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा शोधून काढण्यासाठीचे ते माध्यम आहे. युवकांनी आणि अन्य नागरिकांनी यासाठी आपली मते या माध्यमावर स्पष्टपणे मांडावीत, असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.
केंद्र सरकारप्रमाणेच गोव्यातील सरकारही लोकांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि आपल्या पाशवी बहुमताच्या आधारे आपले निर्णय लोकांवर लादत आहे. अशा सरकारला विरोध करण्याची गरज आहे. लोकांचा आवाज सर्व जगात पोहोचावा यासाठी गोवा फॉरवर्डने समाजमाध्यमातून ही मोहीम सुरू केली आहे. गोव्यातील संस्कृती, अर्थव्यवस्था, रोजगार आदी क्षेत्रांत जे प्रश्न सतावत आहेत ते लोकांनी या माध्यमातून मांडावेत. आमच्या समस्या जगाने ऐकून त्या दूर करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न व्हावेत यासाठी या माध्यमाचा वापर व्हावा, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.