प्रतिनिधी / पणजी
वर्ष 2020-21 साठी राज्यास नियोजित कर्ज घेण्यास केंद्र सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार गोवा सरकारने सुमारे 54 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. दि. 29 डिसेंबर रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट मुंबई शाखेत या रोख्यांचा लिलाव होणार आहे. हे कर्जरोखे पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहेत.
इच्छुक बोलीदारांना त्या दिवशी सकाळी 10.30 ते 11.30 या दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग सोल्युशन (ई-कुबेर) पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे बोली लावता येणार आहे. लिलावाचा निकाल त्याच दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. यशस्वी बोलीदारांनी दि. 30 डिसेंबर रोजी बँकेचे कामकाज संपण्यापूर्वी रोख, धनादेश, पे ऑर्डर, डिमांड ड्राफ्ट यांच्या माध्यमातून पेमेंट करावे.
या लिलावात बिगर स्पर्धा तत्वावर संस्था तसेच व्यक्तिगत बोलीदारांनाही सहभागी हेता येईल. त्यासाठी मूळ रकमेच्या जास्तीत जास्त 10 टक्के मर्यादेत रोखे खरेदी करता येणार आहेत, असे वित्त खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.