नागठाणे / प्रतिनिधी
ग्वाल्हेर-बँगलोर आशियाई महामार्गावर वळसे (ता.सातारा) गावच्या हद्दीत भरधाव वेगात असणा र्या टँकरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चौदा चाकी तेलाची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. दुभाजकावरील सुमारे ३०० फुटाचे संरक्षक ग्रील तोडून हा टँकर महामार्गाच्या विरुद्ध लेनवर एका कारला धडकला. काल, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सुदैवाने टँकर व कार मधील कोणीही जखमी झाले नाही.
जे.एन.पी.टी (उरण) येथून सुमारे ३२ टन गोडेतेल घेऊन चौदा चाकी टँकर कोल्हापूरकडे निघाला होता. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास शेंद्रे (ता. सातारा) येथील उड्डाणपूल पार करून भरधाव वेगाने निघालेल्या या टॅंकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो वळणावरील दुभाजकामधील सुमारे ३०० फुटाचे संरक्षक काठाडे उध्वस्त करत कोल्हापूर-सातारा लेनवर आला. टँकरचा वेग इतका होता की त्याच्या दोन्ही बाजूच्या पुढच्या टायर व चेसीच्या मधल्या जागेतून हे लोखंडी संरक्षक बार घुसून पाठीमागून सुमारे ५० फूट बाहेर आले होते.
याचवेळी समोरून येत असलेल्या हुंदेई अमेझा कार चालकाने महामार्ग ओलांडून आलेला टँकर पाहून त्याची कार तशीच रिव्हर्स गिअर टाकून मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगात असलेला टँकर चाकांमध्ये बार अडकल्याने पलटी होत तसाच कारवर येऊन आदळला. सुदैवाने या भीषण अपघातातून कारमधील दोघे व टँकर मधील दोघे बाल-बाल बचावले. या अपघाताने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. बोरगाव पोलीस, महामार्ग पोलीस व हायवे हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी सेवारस्त्यावरून वाहतूक वळवून सुरू केली. सुमारे चौदा तासानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.