नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
आधीच कोरोनाचे सावट त्यात महागाईचा भडका उसळला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या समोर जगायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच वाढले असताना आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीही वाढवल्या आहेत.
महिन्याच्या सुरूवातीलाच घरगुती सिलेंडरच्या किंमतीही वाढवल्याने महिना कसा काढायचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
१४ किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करत असतात. याआधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. तर एप्रिल महिन्यात १० रुपयांनी दर कमी करण्यात आले होते. तसेच फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. दरम्यान या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात एकूण १४० रुपयांची वाढ झाली आहे.