ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील जमनाकुंड भागात राहणाऱ्या चार वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांवर लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन करत प्रवास केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन असतानाही संबंधित मुलीच्या पालकांनी मुलीसोबत नातेवाईकांकडे 18 किमी दुचाकीवरून प्रवास केला. कोरोनाग्रस्त मुलीचे पालक राहत असलेला जमनाकुंड भाग यापूर्वीच कोरोना रुग्ण आढळल्याने सील करण्यात आला होता. तरी देखीलमुलीच्या वडिलांनी पोलिसांना आपण सरकारी कर्मचारी असल्याचे सांगत कुटुंबीयांसोबत दुचाकीवर प्रवास केला.
मुलीला शनिवारी कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुलीच्या आई-वडिलांनाविलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.