कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय : संशोधकांचा अभिप्राय, अद्यापही सावधानता हवीच
वृत्तसंस्था / लंडन
अरूंद कॉरीडॉर्स किंवा चिंचोळी बंदीस्त जागा अशा स्थानी काम करायचे असेल तर कोरोना टाळण्यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे, असे ब्रिटन, अमेरिका आणि चीनमधील संशोधनात आढळून आले आहे. ज्या बंदीस्त जागी जास्त लोक काम करत आहेत, त्यांनी स्वतःची आणि दुसऱयाचीही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण कोरोना हा हवेतून वेगाने पसरणारा रोग आहे. एकमेकांच्या श्वासोश्वासातून तो अधिक झपाटय़ाने संक्रमित होतो. त्यामुळे ही काळजी घ्यावी लागणार आहे, असे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. विशेषतः अशा स्थानी वेगाने काम केल्यास श्वासोश्वास जलद होतो आणि कोरोनाची लागण त्वरित होते.
कमी क्षेत्रफळाच्या कक्षात दाटीवाटीने बैठे काम करणे हे कोरोनासाठी आग्रहाचे निमंत्रण ठरते. अशा जागांमध्ये एकाने सोडलेला श्वास हा बाजूच्या व्यक्तीने घेतलेला श्वास ठरू शकतो. अशा स्थानी एक व्यक्ती जरी कोरोनाबाधित असली तरी तिच्यापासून बऱयाच निरोगी व्यक्तेना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बंदीस्त जागांमध्ये हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था करावी, असे संशोधकांनी सुचविले आहे.
एकत्र चालतानाही…
काम संपवून सर्व लोक एकाचवेळी बाहेर पडतात. अशावेळी बाहेर पडण्याच्या जागांवर एकाच वेळी बरीच गर्दी होते. तसेच अनेक लोक एकाचवेळी अरूंद पॅसेज किंवा कॉरिडॉर तसेच लिफ्टमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले तर कोरोना संसर्गासाठी अनुकूल ठरू शकते. त्यामुळे काम करण्यासाठी किंवा काम संपल्यानंतर एकाचवेळी कार्यालयात जाणे किंवा कार्यालयातून बाहेर पडणे टाळावे, अशी महत्वपूर्ण सूचना संशोधकांनी कर्मचाऱयांना केली आहे.
वस्तू नव्हे, हवा हे माध्यम
प्रारंभीच्या संशोधनानुसार आपण हाताळत असलेल्या वस्तू, पॅकेजेस, खाद्यपदार्थ इत्यादी माध्यमांमधून कोरोनाचा प्रसार होतो अशी समजूत निर्माण झाली होती. त्यामुळे सतत सॅनिटायझरचा उपयोग, पॅकेजे किंवा आवरणे हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुणे, फरशी सातत्याने निर्जंतुक ठेवणे, दरवाजांच्या कडय़ा, हँडलस् इत्यादी नेहमी स्वच्छ ठेवणे इत्यादी उपायांवर भर दिला जात होता. तथापि, अलिकडच्या काळात केलेल्या संशोधनानुसार असे विश्वसनीयरित्या समजले आहे की, कोरोनाचा जास्तीत जास्त संसर्ग हा वस्तू हाताळल्यामुळे नव्हे तर कोरोना विषाणूयुक्त हवेत श्वासोश्वास केल्याने होतो. त्यामुळेच बंदीस्त आणि खेळती हवा नसलेल्या जागी अधिक काळ बसणे टाळावे. ते टाळणे शक्य नसेल तर अशा जागांमध्ये वायुविजनाची (व्हेंटिलेशन) व्यवस्था करावी, असे सुचविण्यात आले आहे.
प्रसार जागेच्या आकारावर अवलंबून
जागा लांब तितकीच रूंद अणि मोकळी व उघडय़ा खिडक्या भरपूर असणारी असेल तर श्वासावाटे कोरोनाची लागण होण्याची शक्यता बरीच कमी होते. मात्र रूंद अतिशय कमी आणि लांबी भरपूर अशा बंदिस्त जागेत वावर असेल तर कोरोनाची लागण अतिशय वेगाने होते असे दिसून आले आहे.