वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
साध्या फ्ल्यूपेक्षा कोरोना अनेक पट अधिक घातक असल्याचे सिद्ध करणारे संशोधन अमेरिकेत झाले आहे. मृत्यूची शक्यता कोरोनाच्या संदर्भात साध्या फ्ल्यूपेक्षा 5 पट अधिक आहे. परिणामी, कोणताही ताप किंवा लक्षणांकडे साधा फ्ल्यू असेल म्हणून दुर्लक्ष मुळीच करू नये, असे संशोधकांनी बजावले आहे.
साध्या फ्ल्यूचे विषाणू आणि कोरोनाचे विषाणू माणसाच्या फुप्फुसांवर हल्ला करतात. मात्र, कोरोनाचे विषाणू इतर अवयवांवरही विपरीत परिणाम करतात. मूत्रपिंड आणि यकृत या अवयवांना कोरोनाच्या संसर्गात इजा होण्याची शक्यता असते. याशिवाय रक्ताच्या गुठळय़ा होण्याचे प्रमाण वाढणे, हृदयावर परिणाम होणे, रक्तदाब कमी होणे, सेप्टीक शॉक, पक्षाघात, मधुमेह वाढणे किंवा निर्माण होणे, इत्यादी विकार कोरोनामुळे वाढतात किंवा निर्माण होतात असे दिसून आले आहे. हे संशोधन वॉशिंग्टन विद्यापीठाच्या औषध प्रयोगशाळेत करण्यात आले असून त्यांचे निष्कर्ष ‘द बीएमजे’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
जगभरातील अनेक रूग्णांचे कोरोना बरे झाल्यानंतरचे प्रकृती संबंधाचे अहवाल संशोधकांनी तपासले आहेत. तसेच अनेक रूग्णांवर ते कोरोनामुळे आजारी असताना तसेच बरे झाल्यानंतर प्रयोग करण्यात आले. त्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
हे प्रयोग साध्या फ्ल्यूच्या 12 हजार 676 रूग्णांवर करण्यात आले. त्यांपैकी 674 जणांचा (5.3 टक्के) मृत्यू झाला. तर प्रयोग करण्यात आलेल्या 3 हजार 641 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 676 जणांचा (18.5 टक्के) मृत्यू झाला, असे संशोधकांनी स्पष्ट केले.