वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेले डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते जोसेफ बायडन यांनी परंपरा मोडून कॅपिटॉल हिलच्या बाहेर शपथग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. ते येत्या 20 जानेवारीला शपथबद्ध होतील. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेत परंपरेनुसार कॅपिटॉल हिलच्या परिसरात नूतन अध्यक्षांचा शपथग्रहण समारंभ पार पडतो. याच परिसरात व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान आणि अमेरिकन प्रतिनिधीगृहे आहेत. मात्र ंयावर्षी अमेरिकेत कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नागरीकांवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. ती पाहता शपथग्रहण समारंभ अन्यत्र होणार आहे.
सत्तारोहणाची तयारी बायडन यांच्या सत्तारोहणासाठी
डेमॉपेटिक पक्षाने जोरदार तयारी चालविली असून प्रथेप्रमाणे त्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीने मंगळवारी शपथविधी कार्यक्रमाची ढोबळ रूपरेषा घोषित केली. या कार्यक्रमाला मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित राहणार नाहीत, अशी अटकळ प्रथम होती. तथापि ते आता या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
साधा समारंभ होणार
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही गर्दी होण्याची शक्यता टाळण्यासाठीच बंद सभागृहात थोडक्यात हा कार्यक्रम आटोपण्याची योजना असल्याचे सांगण्यात येते. तसेच कार्यक्रमानंतर मान्यवरांना भोजन देण्याची प्रथाही यंदा पाळली न जाण्याची शक्यता आहे.