फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने वापरता येणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी गेल्या दहा महिन्यांपासून विविध नियमांच्या चौकटीत अडकलेल्या सिनेमागृहे आणि जलतरण तलावांवरील (स्विमिंग पूल) निर्बंध आता शिथील करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी बुधवारी नवी अधिसूचना जारी करत सिनेमागृहे आणि जलतरण तलावांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. नवे निर्देश 1 फेब्रुवारीपासून लागू असणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहेत. यापूर्वी चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत नवी मार्गसूचीही जाहीर करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने नवी नियमावली जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुधारित निर्देश दिले. निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेन्मेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यांच्या नियमावलीप्रमाणे परवानगी दिली जाणार असल्याची स्पष्टोक्तीही देण्यात आली आहे.