वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कार निर्मितीसाठी लागणाऱया चिपच्या पुरवठय़ामध्ये अडथळे जाणवत असल्याने अनेक कंपन्यांना त्यांच्या कार उत्पादनात कपात करावी लागते आहे. टोयोटा कंपनीने सप्टेंबरमध्ये आपल्या कार उत्पादनामध्ये घट करण्याचा निर्णय घेतला असून फोक्सवॅगन कंपनीनेही कार उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे.
टोयोटा कंपनीने सप्टेंबरमध्ये 9 लाख कार्सचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु चिपचा पुरवठा नियमीत होत नसल्यामुळे सदरच्या प्रस्तावित उत्पादनामध्ये 40 टक्के इतकी कपात करण्याचे कंपनीने ठरवले आहे. म्हणजेच पुढील सप्टेंबरमध्ये कंपनी 5 लाख मोटारींचीच निर्मिती करू शकणार आहे. गेल्या वर्षाच्या अखेरपासून ऑटो कंपन्यांना मायक्रो चिपचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवतो आहे. त्यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनामध्ये घट करावी लागते आहे.
फोक्सवॅगनचे उत्पादन प्रभावीत
दुसरीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रातील फोक्सवॅगन कंपनीच्या मोटार उत्पादनावर चिपच्या टंचाईमुळे मोठय़ा प्रमाणात परिणाम जाणवला आहे. जर्मनीतील या कंपनीला आगामी काळामध्ये आपल्या कार उत्पादनामध्ये आणखी घट करावी लागणार आहे. सेमीकंडक्टरचा पुरवठा नियमीतपणे होत नसल्याचे कारण कंपनीने सांगितले आहे.