अमेरिकेच्या अधिकाऱयाचा दावा
रशियाने चीनकडून युक्रेनवर हल्ल्यात वापर करण्यासाठी सैन्य उपकरणे मागितली आहेत असा दावा अमेरिकेच्या एका अधिकाऱयाने केला आहे. यामुळे अमेरिका आणि चीन प्रशासनादरम्यान रोममध्ये होत असलेल्या बैठकीदरम्यान युद्धावरून तणाव वाढला आहे.
जागतिक निर्बंधांपासून वाचण्यासाठी रशियाची मदत करू नका, आम्ही असे होऊ देणार नाही असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी चीनला दिला आहे. जागतिक निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था प्रभावित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रशियाला आर्थिक मदतीचा चीनचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या चिंतेचे कारण ठरला आहे. अलिकडच्या दिवसांमध्ये रशियाने चीनकडून सैन्य उपकरणांसह अन्य मदत मागितली असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
बिडेन प्रशासनाने चीनवर रशियासंबंधी चुकीची माहिती फैलावण्याचाही आरोप केला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या सैन्याकडून युक्रेनवर रासायनिक किंवा जैविक अस्त्रांद्वारे हल्ला करण्यासाठी ही चुकीची माहिती निमित्त ठरू शकते असे अमेरिकेने चीनला सुनावले आहे.
युक्रेन अमेरिकेच्या मदतीने रासायनिक आणि जैविक अस्त्रांच्या प्रयोगशाळा चालवत असल्याचा रशियाच्या खोटय़ा दाव्यांचा चीन प्रचार करत असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे चीन स्वतःचे दोन सर्वात मोठी व्यापारी भागीदार अमेरिका आणि युरोपीय संघासोबत नाजुक स्थितीत पोहोचला आहे. चीनला या बाजारपेठांची गरज असली तरीही त्याने रशियाबद्दल समर्थन दर्शविले आहे. रशियासोबतच्या मैत्रीला कुठलीच सीमा नसल्याचे चीनने म्हटले आहे.