ऑनलाईन टीम / ताईपे :
चीनच्या स्थापना दिनादिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला चीनच्या तब्बल 38 लढाऊ विमानांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा तैवानने केला आहे.
तैवान स्वत:ला स्वतंत्र देश म्हणवून घेतो, मात्र, चीन तैवानला आपला भूभाग मानतो. त्यामुळे तैवानच्या दक्षिण-पश्चिम भागात तैवान नियंत्रित प्रतास बेटाजवळ चीनच्या लढाऊ विमानांच्या हालचाली वारंवार पहायला मिळतात. यावरुन तैवान आणि चीनमध्ये कुरबुरी पहायला मिळतात. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, शुक्रवारी चीनची 18 जे-16 विमाने, 4 सुखोई-30 लढाऊ विमाने, आण्विक क्षमतेने सज्ज असलेले 2 एच-6 बॉम्बर्स आणि एक अँटी सबमरीन लढाऊ विमाने याशिवाय आणखी 13 लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत घुसले होते. त्यामध्ये 10 जे-16 एस, 2 एच-6 एस आणि एक पूर्व इशारा देणारं विमान यांचा समावेश होता. चीनच्या या विमानांना तैवानच्या लढाऊ विमानांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, चीनने यासंदर्भात अद्याप कोणत्याच प्रकारचे अधिकृत वक्तव्य केलेले नाही.