मुलांना वीकेंड अन् सुटीमध्ये एक तास गेम्स खेळता येणार
शाळेच्या दिवसांमध्ये पूर्णपणे बंदी
मुलांमधील गेमिंगचे वाढते प्रमाण आणि दुष्परिणाम पाहता चीनने ऑनलाईन गेमिंगचे नियम आणखीन कठोर करण्याचा निर्णय घेला आहे. नव्या नियमांच्या अंतर्गत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आठवडय़ात 3 तासांहून अधिक वेळ ऑनलाईन गेम खेळण्याची अनुमती नसेल. शाळेच्या दिवसांमध्ये ऑनलाईन गेम्सवर पूर्णपणे बंदी असेल. वीकेंड आणि सुटीच्या दिवसांमध्येही मुले एक तासाहून अधिक वेळ गेम्सकरता देऊ शकणार नाहीत.
1 सप्टेंबरपासून हे नियम लागू झाले आहेत. नव्या नियमानुसार केवळ शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत ऑनलाईन गेम खेळता येणार आहेत. गेमिंग कंपन्या ही बंधने योग्यप्रकारे लागू करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी सरकार देखरेख व्यवस्था मजबूत करत आहे. यासंबंधीच्या ऑनलाईन संवादात अनेक पालकांनी गेमिंगचे व्यसन किशोरवयीनांचे शिक्षण, जीवनासह मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही गंभीर प्रभाव पाडत असल्याचे म्हटले आहे. चीनच्या शासकीय आकडेवारीनुसार देशातील 62 टक्के अल्पवयीन ऑनलाईन गेम्स खेळतात.
तर 13.2 टक्के मोबाइल युजर्स दररोज सरासरी 2 तासांहून अधिक वेळ गेमिंगमध्ये घालवतात. मुले गेमिंगसाठी निश्चित मर्यादा वाढविण्यासाठी नवनव्या पद्धती शोधत होती. गेमिंगच्या व्यसनामुळे किशोरवयीनांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वातही बदल दिसू लागला होता. याचमुळे कठोर भूमिका स्वीकारण्यासाठी सरकारवर दबाव होता.
गेम डेव्हलपर्ससाठी चीन महत्त्वाचा
हे कठोर नियम जागतिक गेमिंग बाजारासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. चीनमध्ये लाखो तरुण-तरुणी ऑनलाईन गेमिंगशी जोडल्या गेल्या आहेत. गेम डेव्हलपर्स चीनला महत्त्वाची बाजारपेठ मानतात. चीनची ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री सुमारे 4.27 लाख कोटी रुपयांची आहे. 2021 मध्ये या क्षेत्राची कमाई 3.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अनुमान आहे.