अमेरिकेची हेरगिरी विमानांनी घुसखोरी केल्याचा चीनचा दावा
वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिका आणि चीन यांच्यामधील तणाव पुन्हा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेची दोन अत्याधुनिक यू-2 स्पाय प्लेन्सनी (टेहळणी विमाने) काही दिवसांपूर्वी आमच्या हद्दीत शिरून सैन्यसराव टिपल्याचा आरोप चीनने केला आहे. ही घटना उत्तर चीनमध्ये घडली असली तरीही ठावठिकाण्याची अचूक माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिकेचे चीनचे आरोप फेटाळले नसले तरीही कुठल्याच नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे.
मागील महिन्यात अमेरिकेची दोन लढाऊ विमाने शांघायपासून केवळ 75 किलोमीटरच्या अंतरावर उड्डाण करताना दिसून आली होती, याच कारणामुळे दोन्ही देशांमधील हा तणाव अत्यंत गंभीर मानला जात आहे.
अमेरिकेच्या नौदलाच्या दोन यू-2 विमानांनी उत्तर भागातील आमच्या सैन्याच्या सरावाची अनेक तासांपर्यंत हेरगिरी केली. या हेरगिरीमुळे आमच्या प्रशिक्षणावर प्रभाव पडला आहे. अमेरिकेने दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन केल्याचा दावा चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु क्विन यांनी केले आहे. अमेरिकेचे हे कृत्य अत्यंत धोकादायक आहे. चीनच्या भागात घुसखोरी केल्यास सैन्यकारवाई केली जाण्याची शक्यता होती. चिनी सैन्य एक नव्हे तर दोन ठिकाणी सराव करत होते असे चीनच्या शासकीय प्रसारमाध्यमाने म्हटले आहे.
आम्ही आमच्या मर्यादांचे पालन करूनच काम केले असून कुठल्याच नियमाचा भंग केलेला नाही. यापूर्वीही आम्ही हिंदी महासागरात मोहिमा करत आलो आहोत आणि भविष्यातही करत राहू असे अमेरिकेच्या वायुदलाने म्हटले अहे. चीनच्या दाव्याबद्दलच संशय वाटतो. अमेरिकेच्या विमानांना चीनमध्ये शिरण्याची मूळात आवश्यकताच नाही. अत्याधुनिक असलेली ही विमाने कित्येक किलोमीटर अंतरावरूनही प्रत्येक गोष्टीची माहिती प्राप्त करू शकतात असे अमेरिकेचे सैन्यतज्ञ कार्ल चेस्टर यांनी सांगितले आहे.
चीन हतबल
यू-2 विमान अनेक तासांपर्यंतच्या चीनच्या हवाईहद्दीत 70 हजार फुटांच्या उंचीवर घिरटय़ा घालत होते. या विमानांनी सैन्याचा पूर्ण सराव टिपला आहे. स्वतःचे काम आटोपल्यावर या विमानांनी सहजपणे हिंदी महासागरातील स्वतःच्या तळावर धाव घेतली आहे. चीनच्या सैन्याला याचा सुगावा देखील लागला नव्हता. परंतु इमेजरीत या विमानांबद्दल चीनला थांगपत्ता लागला आहे, कारण तेव्हा विमाने कमी उंचीवर आली होती.
चीनला सतावतेय भीती
यू-2 स्पाय एअरक्राफ्ट 70 हजार फुटांवरूनही जमिनीवर होणारी सुक्ष्म हालचालही टिपू शकते. या हालचालींची छायाचित्रे काढण्यासह एचडी व्हिडिओही तयार करू शकते. विशेष बाब म्हणजे या विमानाला क्षेपणास्त्र स्पर्शही करू शकत नाही. अमेरिकेकडे याच्यापेक्षाही अनेक पटीने क्षमता असलेली टेहळणी विमाने आहेत.