वृत्तसंस्था / जकार्ता :
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान आता चीन आणि इंडोनेशियात तणावाचे प्रकरण समोर आले आहे. तणावाच्या स्थितीत इंडोनेशियात नतूना बेटसमूहावर स्वतःच्या अनेक युद्धनौका आणि लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
दक्षिण चीन समुद्राच्या एका बेटावर स्वतःचा अधिकार दर्शविण्यासाठी नतुना बेटसमूहावर अनेक युद्धनौका आणि लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. याचबरोबर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो हे स्वतः तेथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती विदोदो पोहोचण्यापूर्वीच इंडोनेशियाच्या सैन्याने तेथील स्वतःच्या सामर्थ्यात वाढ केली आहे.
या बेटावर केवळ इंडोनेशियाचा अधिकार असल्याचे उद्गार विदोदो यांनी काढले आहेत. तर या क्षेत्रात चीनचा इंडोनेशियासह व्हिएतनाम, फिलीपाईन्स आणि मलेशियासोबतही वाद सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी या वादग्रस्त क्षेत्रातून चीनच्या अनेक युद्धनौकांनी प्रवास केल्याने तणाव उद्भवला आहे. चीनच्या या कृत्यानंतर इंडोनेशियाने चीनच्या राजदूताला पाचारण करत स्वतःचा आक्षेप नेंदविला आहे.
तर दुसरीकडे चीन पूर्ण दक्षिण चीन समुद्रावर स्वतःचा एकाधिकार दर्शवू पाहत आहे. हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख मार्ग असण्यासह मासळींचे मोठे भांडार मानले जाते. दक्षिण चीन समुद्रावर चीनने नेहमीच एकतर्फी अधिकार दर्शविला असला तरीही इंडोनेशिया आणि व्हिएतनाम दरम्यान येणाऱया समुद्राचा हिस्सा सुमारे 35 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये फैलावलेला आहे. या हिस्स्यावर चीन, फिलीपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेईने दावा मांडला आहे. या भागात शेकडो सागरी जीव आढळून येतात.
या भागात सुमारे चार वर्षांपूर्वी समुद्रात उत्खनन करणाऱया नौका, बांधकाम साहित्य पोहोचले होते. चीनने तेथे एक छोटय़ा सागरी क्षेत्रात बंदर निर्माण केल्यावर धावपट्टी तयार केली होती. चीनने काही काळातच दक्षिण चीन समुद्रात एक कृत्रिम बेट तयार करून त्यावर सैन्यतळ निर्माण केला आहे. या भागात चीनने त्यानंतर अनेक छोटय़ा बेटांवर सैन्यतळ निर्माण केल्याने वाद उद्भवला आहे.