विजय जाधव/ गोडोली
महामार्गालगत शासकीय मोकळ्या जागेत एकाच व्यक्तीने अनेकांना नोटरी करून लाखो रुपये डिपाँझीट घेऊन भाडेकरू ठेवले आहेत. महिन्याला तब्बल 5 लाखांचे भाडे गोळा होत असून त्यात काही गुंडानी जागा बळकावल्या आहेत. येथील भंगार विक्रेत्यांने पत्र्याचा आडोसा करून पुढे भंगार आणि मागे बंगल्याचे बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामासाठी कृष्णानगर येथील नियोजित मेडिकल काँलेजच्या जागेतील अतिक्रमण काढले तेथील वीटा आणि बांधकाम साहित्याचा वापर केला आहे.
कृष्णानगर येथील अतिक्रमण काढल्यावर मोठय़ा प्रमाणावर साहित्य चोरीला गेले होते. याबाबत तक्रारी झाल्या मात्र कोण घेऊन गेले याबाबत पोलिसांना हि माहिती मिळाली नाही.येथील वीटा आणि खिडक्या, दरवाजे, लोखंड चोरीला गेले. त्याच साहित्यातून महामार्गालगत अतिक्रमण केलेल्या भंगार विक्रेत्यांच्या बंगल्याचे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी माहिती दिली.
दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढून घेतले की महामार्गालगत लांब पल्ल्याच्या एसटी बसेसाठी थांबा करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत.
पोलिसांकडून या अतिक्रमण करणाया प्रत्येकाची कुंडली तयार केली जात असून फुकटच्या जागेवर केलेल्या कमाईचा हिशोब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी महाराष्ट्र दिना दिवशी आमरण उपोषणचा इशारा दिला असल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून अतिक्रमण हटविण्यासाठी अचानक कारवाईची तयारी सुरू केली आहे. खेड मंडलाधिकारी यांचा स्थळ पाहणी अहवाल मंगळवारी तहसिलदारांना सादर केला जाणार आहे. तर शासकीय जागेवर महामार्गाला खेटून रेटून केलेले अतिक्रमण काढण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने थेट जिल्हाधिकायांनी बोलणी करत कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत आहे.याचा मास्टर प्लँन तयार होऊ लागला आहे.
कधी काळी महामार्गासाठी दोन कुटुंबाची जागा अधिग्रहण करून त्यांना त्याचा मोबदला दिला आहे. तरीही त्या कुटुंबातील सध्याचे वारसदार त्या शासकीय जागेवर आपला हक्क दाखवत भाडेकरू ठेवून महिन्याला लाखो रुपये भाडेपोटी कमाई करत आहेत.
पिरवाडी गट नं. 13/34/ अ या जागेवर असलेली सर्व अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकामे उभी आहेत. एकाही बांधकामाची नोंद खेड ग्रामपंचायतीच्या दप्तरात नाही. कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी नाही, स्टँप पेपरवर हमीपत्र देऊन लाईट, प्राधिकरणाचे पाणी कनेक्शन घेतलेली आहेत.त्यामुळे नवीन रुजू झालेले धडाकेबाज प्रांताधिकारी रिचर्ड अँन्शन यांच्या कडून पोलीस बंदोबस्तात या प्रकरणात दणका दिला जाण्याची शक्यता आहे. शासकीय जागेतील अतिक्रमण एका दिवसात काढण्यासाठी महामार्ग , जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग ,पोलीस विभाग तयारी तर मोकळ्या जागेत पर्यावरण पुरक सुशोभीकरण आणि एसटी थांबा उभा राहिलेला लवकरच दिसणार आहे.