उलानबातार (मंगेलिया)
रविवारी येथे समाप्त झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियाला पुन्हा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर रवि दाहियाने सलग तिसऱयांदा सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या विकी चहरने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत भारताने एकूण 17 पदकांची कमाई केली आहे.
पुरूषांच्या 92 किलो वजन गटातील झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत कझाकस्तानच्या अझमत दौलतबिकोव्हने भारताच्या दीपक पुनियाला 6-1 अशा गुणांनी पराभूत करून सुवर्णपदक पटकाविले. या लढतीत अझमतच्या भक्कम बचावासमोर दीपक पुनियाला केवळ एक गुण मिळविता आला. या वजन गटात दीपक पुनियाने इराणच्या अलनजेगचा 6-0 तसेच त्यानंतर कोरियाच्या किमचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. आशियाई स्पर्धेतील दीपक पुनियाचे हे चौथे पदक आहे. दीपक पुनियाने 2021 साली या स्पर्धेत रौप्य तर 2019 आणि 2020 साली कांस्यपदके मिळविली होती.
पुरूषांच्या 92 किलो वजनगटात भारताच्या विकी चहरने कांस्यपदक मिळविताना उझ्बेकच्या अजेनीयाजचा 5-3 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत पुरूषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल गटात भारताच्या रवी दाहियाने एकमेव सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेच्या इतिहासात रवि दाहियाने सलग तिसऱयांदा सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम केला आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया रवि दाहियाने जपानच्या रिकुतो अराईचा पराभव केला. तत्पूर्वी त्याने मंगोलियाच्या झेनदेनबदचा 12-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम लढतीत त्याने जपानच्या अराईचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले.
या आंतरखंडीय कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण 17 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये दाहियाचे एकमेव सुवर्णपदक आहे. ग्रीको रोमन प्रकारात भारतीय मल्लांनी पाच पदकांची कमाई केली. 61 किलो वजनगटातील कास्यपदकाच्या लढतीत किर्जिस्तानच्या युलूकबेकने भारताच्या मंगल कादियानचा 6-4 असा पराभव केला. 125 किलो वजनगटात पात्र फेरीच्या लढतीत भारताच्या यश तुनीरला उझ्बेकच्या इक्तियारकडून 10-11 अशा केवळ एका गुणांच्या फरकाने हार पत्करावी लागली. त्याचप्रमाणे कोरियाच्या जंगने भारताच्या अनिरूद्धकुमारचा उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 8-4 अशा गुणांनी पराभव केला.
या स्पर्धेत भारताच्या गौरव बलियानने 79 किलो वजनगटात रौप्यपदक, नवीनने 70 किलो गटात तसेच सत्यवर्त कादियान यांनी प्रत्येकी एक कास्यपदक पटकाविले.