प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नूतन इमारतीत गेल्या दोन वर्षापासून जंबो कोविड सेंटर सुरु होते. ते सध्या बंद आहे. जिह्यात 1 जानेवारीपासून वाढत असलेली रुग्णवाढ पहाता पुरातत्व विभागाने ही इमारत लवकरच ताब्यात यावी यासाठी अंतर्गत सजावटीच्या कामासाठी ठेकेदाराकडे काम देण्याकरता निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. दि. 30 जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रियेत भाग घेण्याची मुदत आहे. त्यामुळे याचा ठेका कोण घेणार अन् लवकरच ही इमारत पुरातत्व विभागाच्या ताब्यात यावी अशा हालचाली सुरु आहेत.
साताऱयात शेतकरी निवासमध्ये जिल्हाधिकाऱयांच्या मालकीच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय महिन्याकाठी भाडे भरुन चालवले जात आहे. हक्काची इमारत हजेरी माळावर उभारण्यात आली आहे. उशिरा का होईना परंतु त्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले. बांधकाम पूर्ण होताच नेमका कोरोना सुरु झाला अन् कोरोनाच्या काळात जिह्यातील कोरोना रुग्णांच्या सेवेकरता तेथे जंबो हॉस्पिटल सुरु करण्यात आले. अनेक रुग्णांवर जिल्हा प्रशासनाने तेथे उपचार केले. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या कमी झाल्याने तेथील जंबो सेंटर बंद करण्यात आले. त्यावेळीही पुरातत्व विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करुन संग्रहालयाची इमारत ताब्यात द्यावी, अशी मागणी केली होती. तो प्रश्न अद्याप भिजत आहे.
दरम्यान, जिह्यात बाधित वाढ पुन्हा वाढू लागल्याने संग्रहालयातील अंतर्गत मांडणी आणि सजावटीच्या कामासाठी ठेकेदारास काम देण्याच्या हालचाली पुरातत्व विभागाकडून सुरु झाल्या. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याकरता दि. 6 पासून निविदा प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे. दि. 30 जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रियेत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याच अनुषंगाने पहिली बैठक दि. 10 जानेवारीला 11 रोजी आहे. निविदा प्रक्रियाचा लखोटा दि. 30 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता उघडण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा लखोटा दि. 4 फेब्रुवारी रोजी 11.30 वाजता उघडण्यात येणार आहे. त्यामुळे जंबो हॉस्पिटल पुन्हा सुरु होण्यापूर्वी संग्रहायलाची स्वतःची इमारत ताब्यात घेण्याची खटपट पुरातत्व विभागाची सुरु झालेली आहे.