व्हिलचेअर, हात जोडलेले अन् हजारोंची गर्दी – दुर्घटनेनंतर मोठे शक्तिप्रदर्शन
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये दुखापतग्रस्त झाल्यावर तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. रविवारी ममतांनी कोलकात्याच्या गांधी पुतळय़ापासून हाजरा मार्गपर्यंत एक मोठे शक्तिप्रदर्शन केले. व्हिलचेअरवर रोड शो करण्यासाठी पोहोचलेल्या ममतांनी येथे पदयात्रेच्या माध्यमातून स्वतःची शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केलआहे. ‘जखमी वाघ अधिक धोकादायक असतो’ असे म्हणत ममतांनी जीवनात अनेक हल्ले सहन केले, पण कधीच मान कुणासमोर झुकविली नसल्याचे विधान केले आहे.
ममतांनी गांधी पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यावर स्वतःच्या मेगा रोड शोला प्रारंभ केला. ममतांनी या रोड शोपूर्वी एक ट्विटही केला आहे. ‘आम्ही पूर्ण शक्तिनिशी लढत राहू. अत्यंत वेदना होत आहेत. पण माझ्या लोकांना होत असलेल्या वेदना मी जाणू शकते. ही लढाई अशा जमिनीसाठी आहे, ज्याकरता आम्ही मोठा संघर्ष केला आहे. आम्ही आणखीन संघर्ष करू, पण भ्याडपणा दाखवून पराभव मान्य करणार नसल्याचे ममतांनी म्हटले आहे.
भाच्याचा सहभाग
ममतांचा रोड शो रविवारी दुपारी सुमारे 2 वाजता सुरू झाला. ममतांच्या या रोड शोमध्ये त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी समवेत अन्य तृणमूल नेते उपस्थित होते. नंदीग्राममधील दुर्घटनेनंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्या आहेत.
प्रचारसभांचा धडाका
ममता बॅनर्जी 15 मार्चपासून सातत्याने प्रचारसभांमध्ये भाग घेणार आहेत. 15 मार्च रोजी पुरुलिया, 16 मार्च रोजी बांकुरा आणि 17 मार्च रोजी झारग्राम येथे ममता बॅनर्जी प्रचारसभांना संबोधित करतील. ममता बॅनर्जी नंदीग्रामध्ये बुधवारी संध्याकाळी जखमी झाल्या होत्या. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. ममतांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.